Syed Mushtaq Ali Trophy 2021: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) शुक्रवारी हरियाणाविरुद्ध (Haryaan) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) सामन्यात मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. पण, अर्जुनसाठी डेब्यू अपेक्षेनुसार ठरले नाही कारण संघाला 8 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. यासह मुंबईचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. बीकेसी मैदानावर (BCK Ground) खेळल्या जाणार्या एलिट ई ग्रुपच्या लीगच्या गटात मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत फक्त 143 धावा केल्या. हरियाणाने हे लक्ष्य 17.4 ओव्हरमध्ये गाठले आणि माजी विजेत्या संघाला स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाची धूळ चारली. अर्जुनने 3 ओव्हर गोलंदाजी केली आणि 34 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने हरियाणाचे सलामीवीर चैत्य बिश्नोईला (Chaitya Bishnoi) 4 धावांवर बाद केले. योगायोग म्हणजे, अर्जुनचे दिग्गज वडिल सचिनने अखेरचा रणजी ट्रॉफी सामना 2013 मध्ये हरियाणाविरुद्ध खेळला होता. मुंबईचा संघ 19.3 धावांवर ऑलआऊट झाला, पण अर्जुनला एकाही चेंडूला सामोरे जाण्याची संधी मिळाली नाही. (Syed Mushtaq Ali Trophy साठी अर्जुन तेंडुलकरचं मुंबईच्या Senior Team मध्ये पदार्पण)
हरियाणा संघाच्या विजयात हिमांशु राणाने महत्वाची भूमिका बजावली आणि 53 चेंडूत नाबाद 75 धावा फटकावल्या. हिमांशूने शिवम चौहानच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करत 14 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. शिवम नाबाद 43 धावा करून परतला. ऑफ स्पिनर जयंत यादव आणि मध्यमगती गोलंदाज अरुण चापराना यांच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईचे फलंदाज निरुत्तर ठरले. मुंबईकडून यशस्वी जैस्वाल याने 35 धावांची खेळी केली तर सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड आणि शिवम दुबे यांना भोपळा ही फोडता आला नाही. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. यापूर्वी संघाला दिल्ली आणि केरळ टीमविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. दिल्लीने पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 8 विकेटने विजय मिळवला तर केरळला दिलेले 197 धावांचा ते बचाव करू शकले नाही. केरळने मोहम्मद अझरुद्दीनच्या नाबाद 137 धावांच्या तुफानी खेळाच्या जोरावर संघाने एकतर्फी विजय मिळवला.
दरम्यान, मुंबई संघासाठी पदार्पण केल्यामुळे 21 वर्षीय अर्जुन आता आयपीएलच्या लिलावासाठी पात्र ठरला आहे. बीसीसीआयने एकूण 22 खेळाडूंची निवड करण्याची परवानगी दिल्यानंतर सलील अंकोलाच्या नेतृत्वात निवड समितीने अर्जुन आणि वेगवान गोलंदाज कृतिक हनागवडीचा मुंबई संघात समावेश केला. गेल्या अनेक वर्षांत अर्जुन मुंबईकडून वयोगटातील स्पर्धा खेळत आहे आणि आमंत्रणात्मक स्पर्धा खेळणार्या संघाचा देखील एक भाग आहे. 2018 श्रीलंकेच्या दौर्यावर अर्जुन भारतीय राष्ट्रीय संघाच्या नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला होता आणि त्याने भारत अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले होते.