IND vs BAN 1st Test 2024: भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज आश्चर्यकारक कामगिरी करताना दिसत आहेत. यादरम्यान प्रथम ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले आणि त्यानंतर शुभमन गिलने (Shubman Gill) शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. शुक्रवारी यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सुरुवातीच्या विकेट पडल्यानंतर पंत आणि गिल यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळली. या दोन फलंदाजांमुळे भारतीय संघाला एकूण 500 हून अधिक धावांची आघाडी मिळवता आली. त्याचवेळी दुसऱ्या डावात शतक झळकावल्यानंतर गिलने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आणि बांगलादेशविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
'हा' केला अनोखा विक्रम
बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिल खाते न उघडता बाद झाला, त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली. मात्र, आता त्याने सर्व टीकेला चोख प्रत्युत्तर देत दुसऱ्या डावात शतक झळकावले. यासह पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक झळकावणारा गिल जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. (हे देखील वाचा: Rishabh Pant Century: धोनीच्या बालेकिल्ल्यात 'ऋषभ पंत'ची हवा, शतक ठोकून 'कॅप्टन कूल'च्या विक्रमाशी केली बरोबरी)
शुबमन गिल गेल्या दोन वर्षात 10 पेक्षा जास्त शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरला असून, शुबमन गिलने त्याच्या कारकिर्दीतील 5 वे कसोटी शतक नोंदवले आहे. यादरम्यान, गेल्या दोन वर्षांत 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा तो पहिला खेळाडू ठरला. गिलने गेल्या दोन वर्षांत 11 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर या यादीत विराट कोहलीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने या कालावधीत एकूण 9 शतके झळकावली आहेत. याशिवाय केन विल्यमसन (8 शतके), ट्रॅव्हिस हेड (7 शतके) आणि रोहित शर्मा (7 शतके) यांच्या नावांचाही या यादीत समावेश आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 287 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले.