न्यूझीलंड संघ (Photo Credit: Representative Image/Getty)

न्यूझीलंडचा बहुप्रतिक्षित पाकिस्तान दौरा (New Zealand Tour of Pakistan) दुर्दैवी पद्धतीने रद्द करण्यात आला. किवी संघ पाकिस्तानमध्ये (Pakistan) तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांसाठी दाखल झाला होता तरी त्यांना एकही सामना न खेळवता मायदेशी परत बोलावण्यात आले. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket Board) हा दौरा अचानक रद्द करण्यामागे सुरक्षेच्या समस्यांचा हवाला दिला. उल्लेखनीय म्हणजे, 2004 नंतर पाकिस्तानच्या भूमीवर न्यूझीलंड संघाची ही पहिली मालिका ठरली असती. ताज्या घडामोडीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) मालिका रद्द झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दरम्यान क्रिकेट बोर्ड सध्या फक्त किवी संघासाठी नियुक्त केलेल्या सुरक्षा अधिकार्‍यांच्या (Security Personnel) जेवणाच्या भरमसाठ बिलाकडे पाहत आहे. अहवालांनुसार, ब्लॅककॅप्ससाठी (BlackCaps) नियुक्त केलेल्या सुरक्षा एजन्सीचा मोठा खर्च आला होता. यामध्ये भर म्हणजे तर पीसीबीला (PCB) न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेत असलेल्या अधिकार्‍यांच्या खाद्य बिलाची भरपाई करण्यासाठी सुमारे 27 लाख रुपयांचा खर्च आला आहे. (ECB: न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा केला रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय)

आनंदबाजार पत्रिकेने असा दावा केला आहे की इस्लामाबाद पोलिसांनी न्यूझीलंड संघाच्या आठ दिवसांच्या पाकिस्तान मुक्कामादरम्यान 27 लाख रुपयांची बिर्याणी फस्ट केली आहे. आनंदबाजार पत्रिकेच्या अहवालानुसार, प्रत्येक सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिवसातून दोनदा बिर्याणी देण्यात यायची, ज्याची किंमत अंदाजे 27 लाख रुपये इतकी झाली आहे. दरम्यान, रावलपिंडी येथे झालेल्या पहिल्या वनडेच्या काही तास आधी हा दौरा रद्द करण्यात आला. याशिवाय, 24NewHD टीव्ही चॅनेलच्या अहवालात असेही लिहिले आहे की न्यूझीलंड संघ त्यांच्या दौऱ्याचा भाग म्हणून इस्लामाबाद येथील सेरेना हॉटेलमध्ये थांबला होता. येथे इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरी पोलिस खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. या अंतर्गत 500 पोलिसांची ड्यूटी हॉटेलमध्ये होती. यामध्ये पाच एसपी आणि अनेक एसएसपींचा समावेश होता. हॉटेलचं बिल मंजूर करण्यासाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आले तेव्हा ही बाब उघडकीस आली.

दरम्यान, न्यूझीलंड संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. संघात मुख्य खेळाडू नव्हते त्यामुळे अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला. पण क्वारंटाईन आणि सराव केल्यानंतर, ज्या दिवशी सामना होणार होता त्याच दिवशी रद्द करण्यात आला. न्यूझीलंडकडून असे म्हटले गेले होते की त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. मात्र, हा दौरा रद्द करण्यावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला होता. बोर्डाने म्हटले होते की किवी खेळाडूंना कोणत्या प्रकारच्या धमक्या मिळाल्या हे त्यांना सांगितले गेले नाही. दोन्ही संघांमधील सामने रावळपिंडी येथे होणार होते.