Shoaib Akhtar on Sushant Singh Rajput: शोएब अख्तरने सांगितला सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील भेटीचा किस्सा, 'तेव्हा त्याच्याशी बोललो नाही याचा मला पश्चात्ताप होतोय'
शोएब अख्तर, सुशांत सिंह राजपूत (Photo Credit: Getty/Facebook)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी रविवारी, 14 जून गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने असे का केले यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र व्यावसायिक वैमनस्य आणि त्यातून आलेले नैराश्य यापुढे सुशांतने हार मानली अशी चर्चा सध्या चहूबाजूला रंगली आहे. 2013 मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याची महेंद्र सिंह धोनीच्या चित्रपटातील भूमिका सर्वाधिक गाजली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) बॉलिवूड अभिनेत्याच्या दुःखद निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्याच्या सोबत पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. शोएब म्हणाला 2016 मध्ये त्याची सुशांतशी भेट झाली आणि तेव्हा त्याच्याशी न बोलण्याचा त्याला आता पश्चताप होत आहे. (अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरूच राहणार; कुटुंबीयांनी घेतला महत्त्वाचा निर्णय)

“2016 मध्ये भारतातून जाण्याआधी मी त्याला मुंबईत भेटलो. तो माझ्या बाजूने डोकं खालच्या दिशेला करून निघून गेला. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला सांगितलं की हा अभिनेता धोनीची भूमिका करणार आहे,” अख्तरने युट्यूबच्या व्हिडिओत सांगितले. “मला वाटलं की आता त्याचा अभिनय मला पहावा लागेल. तो एका नम्र पार्श्वभूमी तून आला आहे आणि तो एक चांगला चित्रपट बनवित आहे. हा चित्रपट यशस्वी ठरला पण त्याला तिथे न थांबविल्याबद्दल आणि आयुष्याबद्दल त्याच्याशी बोलण्याची संधी न मिळाल्याबद्दल मला वाईट वाटते. मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव त्याला सांगितले असते. कदाचित ते अनुभव ऐकून त्याला त्याच्या जीवनात थोडा फायदा झाला असता. पण तसं घडलंच नाही. मी त्याच्याशी बोललो नाही याचा मला आता पश्चात्ताप होतोय”, अख्तर पुढे म्हणाला.

अख्तरने असेही म्हटले की 14 जून रोजी आत्महत्या केलेल्या सुशांतला मदतीची गरज होती आणि आयुष्याचा शेवट हा कधीही पर्याय असू नये. “आयुष्य संपवणे हा कधीही पर्याय असू शकत नाही. अडचणी आयुष्यातील एक भाग आहे परंतु जेव्हा आपल्याला माहित असेल की आपल्याला समस्या आहेत तेव्हा आपण त्यावर चर्चा केली पाहिजे. मला वाटते की सुशांतलाही मदतीची गरज होती,” अख्तर म्हणाला.