IPL 2020: CSK आयपीएल स्पर्धेबाहेर होताच शेन वॉटसनने सर्व फॉर्ममधून निवृत्ती जाहीर करणार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच झालाय पॅकअप
शेन वॉटसन (Photo Credit: Getty)

Shane Watson To Retire From ‘all forms of cricket’:  ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू आणि चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) स्टार फलंदाज शेन वॉटसन (Shane Watson) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. 39 वर्षीय वॅटसनने यापूर्वी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली परंतु इंडियन प्रीमियर लीगसह (Indian Premier League) फ्रँचायझी-आधारित क्रिकेट स्पर्धा खेळत होता. अबू धाबी येथे रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या अंतिम आयपीएल (IPL) 2020 सामन्यानंतर वॉटसनने हा निर्णय घेतला असला तरी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या निर्णयावर वॉटसनकडून अधिकृत घोषणा येणे शिल्लक आहे. वॉटसन गेली कित्येक वर्षे इंडियन प्रीमियर लीगच्या मुख्य खेळाडूंपैकी एक होता. 2008 मध्ये आयपीएलचे पहिल्या विजेतेपद जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) तो सदस्य होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीमध्ये सामील होण्यापूर्वी वॉटसनने रॉयल्सबरोबर 7 यशस्वी वर्षे होता. आरसीबी संघात सामील झाल्यावर वॉटसनला फारसे यश मिळाले नाही. तथापि, माजी चॅम्पियन्सने आयपीएल 2018 च्या लिलावात खरेदी केल्यावर शेन वॉटसनने चेन्नई सुपर किंग्जमधील आयपीएल कारकीर्दीत पुनरुज्जीवन केले.

वॉटसन 2018 मध्ये सीएसकेच्या विजेतेपद जिंकण्याच्या मोहिमेचा एक भाग होता. इतकंच नाही तर आयपीएल 2019 मध्ये सीएसकेला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यंदाच्या युएई येथील स्पर्धेत देखील संपूर्ण फॉर्ममध्ये नसतानाही वॉटसनने सीएसकेसाठी दोन अर्धशतकं ठोकली. अधिकृतरीत्या अद्याप कन्फर्मेशन येणे बाकी असले तरी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार वॉटसनने आपल्या सर्व साथीदारांना सांगितले की आपण खेळाच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार आहोत. "शेवटच्या सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याचे सीएसके ड्रेसिंग रूमला सांगितले तेव्हा वॉटसन खूपच भावनिक झाला. फ्रँचायझीसाठी खेळणे हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान असल्याचे त्याने सांगितले," एका सूत्राने TOI ला सांगितले.

यंदाच्या हंगामात पहिल्यांदा सीएसके संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय करण्यासाठी अपयशी ठरला. दरम्यान, 2021 हंगामात वॉटसन यांना सीएसके सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट करता येईल, असेही अहवालात सुचविण्यात आले आहे.