2011 मध्ये भारतात आयोजित केलेला वर्ल्ड कप (World Cup) भारतीय संघाने जिंकत 28 वर्षाचा दुष्काळ संपवला. महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात टीम इंडियाने ही कमाल केली. संपूर्ण स्पर्धेत युवराज सिंहने (Yuvraj Singh) दमदार फलंदाजी केली आणि अखेरच्या सामन्यात देखील त्याच्याकडून अशीच अपेक्षा होती. त्यामुळे, श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यावर युवी फलंदाजीला येईल अशी अपेक्षा होती, पण त्याच्या ऐवजी तेव्हाचा कर्णधार धोनी फलंदाजीसाठी आला आणि सर्वांना चकित केलं. याच गोष्टीबाबत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सहवागने (Virender Sehwag) एक मोठा खुलासा केला आहे. हा तो क्षण होता जेव्हा श्रीलंकेच्या (Sri Lanka) गोलंदाजांनी भारतावर वर्चस्व बनवले होते. धोनीने स्वतःला युवराजच्या वर बढती दिली आणि 91 धावांची नाबाद खेळी करत भारताला जेतेपदाचा मान मिळवून दिला. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सचिन विश्वचषक विजेतेपदाच्या प्रवासाबद्दल बोलताना सचिनने महत्वाच्या गोष्टी उघडकीस केल्या. (9 Years Of World Cup 2011: युवराज सिंह, सुरेश रैनाने 'या' अंदाजात केली भारताच्या 2011 वर्ल्ड कप विजयाची आठवण)
“गंभीर आणि विराट दोघांनमधील भागीदारी चांगलीच रंगली होती. दोघेही चांगला खेळ करत होते. अशा स्थितीत आम्हाला प्रतिस्पर्धी संघाच्या दोन पावलं पुढचा विचार करण्याची गरज होती. त्याच वेळी मी विरूला सांगितलं की जर डावखुरा फलंदाज (गंभीर) बाद झाला, तर युवराजने फलंदाजीसाठी जावं.. पण जर उजव्या हाताचा फलंदाज (विराट) बाद झाला, तर मात्र धोनीने फलंदाजीसाठी जायला हवं. युवराज तुफान लयीत होता यात वादच नाही, पण श्रीलंकेकडे दोन ऑफ-स्पिनर्स होते. त्यामुळे आयत्या वेळी फलंदाजीच्या क्रमवारीत केलेला बदल फायद्याचा ठरेल असं आम्हाला वाटलं”, सचिन म्हणाला. सचिनच्या वक्तव्याला दुजोरा देत सहवाग म्हणाला की या निर्णयामुळे श्रीलंकेला अंतिम फेरीत पूर्णपणे बॅकफूटवर टाकले. "तो बरोबर होता. डावे-उजवे संयोजन सुरु ठेवणे आवश्यक होते. रणनीतीत झालेल्या हा बदलमुळे श्रीलंकेच्या पचनी पडायला काहीसा उशीरच झाला.”
या निर्णयामागील युक्तिवादाचे स्पष्टीकरण देताना सचिन म्हणाला, त्याने सेहवागला खाली जाण्यास सांगितले होते आणि सूचना पोहचवण्यास सांगितले होते. “श्रीलंकेकडे दोन अनुभवी ऑफ स्पिनर्स होते. त्यामुळे डाव्या-उजव्या फलंदाजाचे मैदानावर असणे महत्त्वाचे होते. गौतम गंभीर अप्रतिम फलंदाजी करत होता. अशा परिस्थितीत एकेरी-दुहेरी धावा काढण्यात माहीर असलेल्या धोनीने मैदानावर जाणं योग्य होतं. त्यामुळे मी विरूला सांगितलं की तू दोन षटकांच्या मध्ये जा आणि धोनीला ही गोष्ट समजावून सांग,” सचिन पुढे म्हणाला.