Team India: विश्वचषक 2011 अंतिम सामन्यातील टीम इंडिया प्लेइंग XI मधील 10 खेळाडूंनी क्रिकेटला म्हटले ‘बाय-बाय’; पण हा खेळाडू आजही गाजवत आहे आंतरराष्ट्रीय मैदान
टीम इंडिया 2011 वर्ल्ड कप सेलिब्रेशन (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट चाहत्यांची तब्बल 28 वर्षांची प्रतीक्षा अखेर 2011 मध्ये संपुष्टात आली. भारतीय संघाने (Indian Team) 2011 विश्वचषक एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात जिंकला आणि टी-20 वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय विजेतेपदाचा मान मिळवला. दरम्यान आता 2023 मध्ये होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषकाची आशा घेऊन टीम इंडिया (Team India) पुन्हा मैदानात उतरणार आहे. तथापि एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे विश्वचषक 2011  अंतिम सामन्याच्या श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेल्या 10 खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. पण त्या सामन्यात खेळलेला एक खेळाडू आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहे, परंतु त्या खेळाडूचा सध्याचा फॉर्म आणि फिटनेस असा आहे, ज्यामुळे तो 2023 चाच नाही तर 2027 चा एकदिवसीय विश्वचषक देखील खेळू शकतो. (S Sreesanth Announces Retirement: भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा)

बुधवार, 9 मार्च रोजी एस श्रीशांतने (S Sreesanth) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्यावर सात वर्षांची क्रिकेट बंदी घालण्यात आली होती, पण नंतर त्याला बीसीसीआय (BCCI) आणि कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली. यानंतर त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्येही पुनरागमन केले. श्रीसंत देशांतर्गत क्रिकेट खेळला, पण त्याला फारसे विशेष काही करता आले नाही. तो आयपीएल 2021 लिलावात देखील उतरला होता, पण त्यापूर्वी BCCI ने त्याला काढून टाकले होते, तर आयपीएल 2022 च्या महा लिलावात यावेळी त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही. आणि अखेरीस त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. अशा परिस्थतीत वर्ल्ड कप 2011 चा फायनल खेळलेला 10 व्या खेळाडूने क्रिकेटचा निरोप घेतला.

वर्ल्ड कप 2011 चा फायनल खेळणाऱ्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलायचे तर यामध्ये वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, विराट कोहली, एमएस धोनी, युवराज सिंह, सुरेश रैना, हरभजन सिंह, झहीर खान, मुनाफ पटेल आणि एस श्रीशांत यांचा समावेश होता. यापैकी 10 खेळाडू आता निवृत्त झाले असून विराट कोहली (Virat Kohli) हा एकमेव खेळाडू आहे जो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. मात्र, कोहली वगळता या सर्व खेळाडूंनी त्याच्या पूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कोहली सध्या 33 वर्षांचा आहे आणि 2027 विश्वचषक दरम्यान तो 38 वर्षांचा होईल. याशिवाय त्याचा सध्याचा फिटनेस पाहता तो सहज त्या विश्वचषकाचा भाग बनू शकतो आणि भारतासाठी पाचवा वर्ल्ड कप खेळू शकतो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. विराटने आतापर्यंत 2011, 2015 आणि 2019 एकदिवसीय विश्वचषक खेळला आहे आणि भारताच्या या संघातील तो एकमेव खेळाडू आहे ज्याने शेवटचे तीन एकदिवसीय विश्वचषक खेळले आहे.