
Rohit Sharma Stats In Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी हळूहळू जवळ येत आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान खेळवली जाईल. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्याच स्पर्धा संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. त्याआधी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंना या मोठ्या स्पर्धेपूर्वी सराव करण्याची संधी मिळेल. बीसीसीआयने 18 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
टीम इंडियाचे मिशन 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात एक रोमांचक सामना खेळला जाईल. यानंतर, टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. टीम इंडियाचा पुढील सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होईल. या स्पर्धेत रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील रोहित शर्माच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.
रोहित शर्माने 2013 ते 2017 दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 10 सामने खेळले आहेत. या काळात रोहित शर्माने 10 डावांमध्ये 53.44 च्या सरासरीने आणि 82,50 च्या स्ट्राईक रेटने 481 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, रोहित शर्माने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बांगलादेशविरुद्ध 123 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाने तो सामना 9 विकेट्सने जिंकला होता.
2013 मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला हरवले. त्या हंगामात, रोहित शर्माने 5 डावांमध्ये 35.40 च्या सरासरीने आणि 75.96 च्या स्ट्राईक रेटने १७७ धावा केल्या.
2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया उपविजेती राहिली होती. अंतिम सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला. गेल्या हंगामात, रोहित शर्माने 5 डावांमध्ये 76.00 च्या सरासरीने आणि 86.85 च्या स्ट्राईक रेटने 304 धावा केल्या. दरम्यान, रोहित शर्माने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली.