Team India (Photo Credit - Twitter)

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) भिडणार आहे. आता या मोठ्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. अनेक स्टार खेळाडू पहिल्या सामन्यातून बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात आपली प्लेइंग 11 कशी उतरवणार हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे. व्हीसीए स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत आहे, अशा परिस्थितीत तीन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेण्यात येवु शकतो. मात्र हे तीन फिरकीपटू कोण असतील, हे पाहणे विशेष ठरणार आहे.

रोहित आणि केएल राहुल देवु शकतात सलामी

बर्‍याच दिवसांनी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी ओपनिंग करताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी कसोटी फॉरमॅटमध्ये अनेक महिन्यांपासून डावाची सुरुवात केलेली नाही. रोहित आणि राहुल हे संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा केली जाईल. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series 2023: नागपूर कसोटीपूर्वी टीम इंडियासमोर 'हे' दोन मोठे प्रश्न, कसे सोडवणार कर्णधार रोहित शर्मा यांचे उत्तर?)

पुजारा आणि कोहली मधल्या फळीत

त्याचवेळी संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. पुजाराने नुकताच बांगलादेशविरुद्ध तीन वर्षांनंतर शतकाचा दुष्काळ संपवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या खेळाडूची कामगिरी नेहमीच उत्कृष्ट असते. दुसरीकडे, सक्रिय भारतीय खेळाडूंमध्ये पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू आहे. पुजारानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरेल. विराट पुन्हा एकदा आपल्या कारकिर्दीतील दमदार फॉर्ममध्ये परतला आहे. या खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध करायचे आहे.

त्याचवेळी शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. गिल की सूर्यकुमार यादव या क्रमांकावर कोणता फलंदाज फलंदाजी करेल याबाबत अजूनही शंका आहे. पण सध्याचा फॉर्म पाहता गिलचे पारडे जरा जड आहे. याशिवाय केएस भरत सहाव्या क्रमांकावर उतरेल. भारतासाठी हा टीम इंडियाच्या जर्सीतील पदार्पण सामना असेल. तो संघाचा यष्टिरक्षकही असेल.

जडेजा आणि अश्विनसोबत तिसरा फिरकीपटू कोण?

यानंतर संघाच्या फिरकी गोलंदाजीचा क्रमांक लागतो. नागपुरातील खेळपट्टीचा हिशोब पाहता एक गोष्ट निश्चित आहे की, चाहत्यांना पुन्हा एकदा रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी मैदानावर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळू शकतो. कुलदीप आणि अक्षर पटेल यांच्या नावावर नक्कीच चर्चा होईल, पण जडेजाच्या उपस्थितीत संघात खेळणे अक्षरसाठी खूप अवघड आहे. त्याचवेळी संघ दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज ही जबाबदारी पार पाडताना दिसतात.

पहिल्या कसोटीसाठी भारताचे संभाव्य 11:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.