
Lata Deenanath Mangeshkar Puraskar: ज्येष्ठ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांना यंदाचा (Lata Mangeshkar Award) जाहीर करण्यात आला आहे. एका निवेदनाच्या माध्यमातून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. अन्य पुरस्कारार्थींमध्ये श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी यांचा समावेश आहे. मंगेशकर कुटुंबाकडून मागील 34 वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. त्यांच्याकडून संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.
आदित्य बिर्ला समूहाचे चौथ्या पिढीचे कुमार मंगलम बिर्ला हे प्रमुख आहेत. वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या अकाली निधनानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी 1995 साली वयाच्या 28 व्या वर्षी कामाची सूत्रे हाती घेतली होती.
'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ 'लता दीनानाथ मंगेशकर'हा पुरस्कार सुरू करण्यात आला. हा पुरस्कार पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. त्यानंतर हा पुरस्कार आशा भोसले यांना, तिसऱ्या वर्षी महानायक अमिताभ बच्चन यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आता चौथे मानकरी कुमार मंगलम बिर्ला आहेत.
दीनानाथ मंगेशकर यांचा 83 वा स्मृतिदिन मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात 24 एप्रिल दिवशी संपन्न होणार आहे.