RCB vs MI, IPL 2019: सामन्यातील शेवटच्या बॉलवरुन वाद; RCB कर्णधार विराट कोहली भडकला (Viral Video)
File Image of Virat Kohli (Photo Credits: IANS)

काल (28 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मध्ये रंगलेल्या आयपीएल (IPL 2019) सामन्यातील शेवटच्या बॉलवरुन वाद उठला आहे. मुंबई इंडियन्सने घालून दिलेल्या 187 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीचा बंगलोर संघ मैदानात उतरला. विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करत असताना शेवटच्या चेंडूने गडबड केली. शेवटच्या चेंडूत बंगलोरला जिंकण्यासाठी 7 धावांची गरज होती. मात्र 'नो बॉल' असूनही पंचाने योग्य तो निर्णय दिला नसल्याने बंगलोर संघाला अवघ्या 6 धावांनी सामना गमवावा लागला. या सर्व प्रकरणानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच भडकला आणि त्याने पंचाना सुनावले.

शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा फास्टर बॉलर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) बॉलिंग करत होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा शिवम दुबे बॅटींग करत होता. मलिंगाने टाकलेला शेवटचा बॉल 'नो बॉल' होता. मात्र त्याकडे अंपायरचे लक्ष गेले नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला हार पत्करावी लागली. पण पंचांनी योग्य निर्णय दिला असता तर मॅचचा निकाल वेगळा असू शकला असता.

या सर्व प्रकरणी भडकलेल्या कर्णधार विराट कोहलीने पंचांना चांगलेच सुनावले. विराट म्हणाला की, "आम्ही आयपीएल लेव्हलवर क्रिकेट खेळत आहोत. हे काही कल्ब क्रिकेट नाही. शेवटच्या चेंडूवर जे काही झाले ते चुकीचे होते. अंपायर्सने यापुढे अतिशय सतर्क राहून काळजीपूर्वक निर्णय देणे गरजेचे आहे." या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या व्हायरल होत आहे. येथे पहा व्हिडिओ...

या सर्व प्रकरणावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "मला नंतर कळेल की तो नो बॉल होता. क्रिकेटमध्ये असे होणे चुकीचे आहे. तसंच पुढे तो म्हणाला की, बुमराहचा एक बॉल व्हाईड असल्याचा निर्णय पंचांनी दिला होता. मात्र तो व्हाईड बॉल नव्हता. त्यामुळे पंचांच्या अशा निर्णयामुळे निराशा होते."