
RCB Vs KKR IPL 2021 Match 10: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 मध्ये आज पहिला डबल-हेडर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या (IPL) आजच्या दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने येत आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आजचा हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी आरसीबीने (RCB) आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे तर केकेआरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स सलग तिसर्या विजयासाठी मैदानात उतरतील. दुसरीकडे, इयन मॉर्गनचे नाईट रायडर्स मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या पराभवाला मागे टाकून विजय पथावर परतण्यासाठी इच्छुक असतील. (IPL: आयपीएलमध्ये या 5 खेळाडूंनी कर्णधार म्हणून ठोकली आहे शतके, यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा)
रॉयल चॅलेंजर्सने डॅन ख्रिश्चनच्या जागी रजत पाटीदारचा अंतिम-11 मध्ये समावेश केला आहे. आजच्या सामन्यात हॅट्रिकच्या इराद्याने विराट सेना मैदानात उतरेल. मागील दोन सामन्यात विजयाने आरसीबीचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला असेल. दुसरीकडे, नाईट रायडर्ससाठी त्यांच्या तडाखेबाज अष्टपैलू आंद्रे रसेलचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. रसेलने मुंबई इंडियन्स विरोधात पाच विकेट घेतल्या मात्र त्याची बॅट अद्यापही शांत आहे. कोलकाताला आपला दुसरा विजय नोंदवण्यासाठी रसेलच्या बॅटमधून धावांची गरज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात वेस्ट इंडिज फलंदाजाच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
केकेआर प्लेइंग XI: इयन मॉर्गन (कॅप्टन), नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंह, प्रसिध्द कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.
आरसीबी प्लेइंग XI: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्क्ल, शाहबाझ अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल.