
Rashid Khan New Record Asia Cup 2025: अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर राशिद खान (Rashid khan) हा टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज मानला जातो. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक १७३ बळी आहेत. तसेच, एकूण टी-२० क्रिकेटमध्येही ६७२ बळींसह तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आता आशिया कप २०२५ मध्ये खेळताना त्याने आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला
आशिया कप टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून राशिद खानने नवा विक्रम रचला आहे. त्याने भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला आहे. भूवनेश्वर कुमार सध्या भारतीय संघातून बाहेर असून, तो या आशिया कपमध्ये खेळत नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी राशिद खानच्या नावावर १२ विकेट्स होत्या, तर भूवनेश्वर कुमारच्या नावावर ६ सामन्यांत १३ विकेट्स होत्या. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात राशिदने ४ षटकांत फक्त २६ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. आता त्याचे एकूण १४ बळी झाले आहेत आणि तो आशिया कप टी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
टी-२० आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- राशिद खान: १४ विकेट्स (अफगाणिस्तान)
- भुवनेश्वर कुमार: १३ विकेट्स (भारत)
- अमजद जावेद: १२ विकेट्स (यूएई)
- वानिंदु हसरंगा: १२ विकेट्स (श्रीलंका)
- हार्दिक पंड्या: १२ विकेट्स (भारत)
अफगाणिस्तानचा पुढील प्रवास
आशिया कप २०२५ मध्ये अफगाणिस्तानने हाँगकाँगला हरवून विजयाने सुरुवात केली होती, पण त्यांना बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. सध्या बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याकडे प्रत्येकी ४ गुण आहेत, तर अफगाणिस्तानकडे २ सामन्यांत २ गुण आहेत. ग्रुप बीमधील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होईल. अफगाणिस्तानचा नेट रन रेट सर्वात चांगला असल्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा विजय त्यांना सुपर-४ मध्ये पोहोचवेल, मात्र पराभव झाल्यास स्पर्धेतील त्यांचा प्रवास संपेल.