राशिद खान (Photo Credit: Getty)

Rashid Khan New Milestone: अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) T20 क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. तो या फॉर्मेटमध्ये आता सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्रिकोणी मालिकेत यूएईविरुद्धच्या सामन्यात त्याने ही मोठी कामगिरी केली. या सामन्यात राशिद खानने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 21 धावा देत 3 बळी मिळवले आणि अफगाणिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अफगाणिस्तानने हा सामना यूएईला 38 धावांनी हरवले.

टिम साऊदीला टाकले मागे

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता १६५ विकेट्ससह राशिद खान पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने अवघ्या 98 सामन्यांत हा विक्रम केला आहे. या बाबतीत त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीला मागे टाकले आहे. साऊदीने 126 सामन्यांत 164 बळी घेतले होते. त्यांच्याच देशाचा खेळाडू ईश सोढी 126 सामन्यांत 150 बळी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन 149 बळींसह चौथ्या आणि मुस्तफिजुर रहमान 142 बळींसह पाचव्या स्थानावर आहेत.

हे देखील वाचा: IND vs ENG 1st ODI 2025 Live Streaming: इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून 'रणसंग्राम', पहिला वनडे सामना भारतात कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह?

T20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

  • राशिद खान: 165 विकेट (98 सामने)
  • टिम साऊदी: 164 विकेट (126 सामने)
  • ईश सोढी: 150 विकेट (126 सामने)
  • शाकिब अल हसन: 149 विकेट (129 सामने)
  • मुस्तफिजुर रहमान: 142विकेट (113 सामने)

अफगाणिस्तानचा मालिकेतील पहिला विजय

अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात झालेल्या या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सेदिकुल्लाह अटल आणि इब्राहिम जादरान यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर 20 षटकांत 4 बाद 188 धावा केल्या. जादरानने 40 चेंडूत 63 तर अटलने 40 चेंडूत 53 धावा केल्या.

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा संघ 20 षटकांत 8 बाद 150 धावाच करू शकला. मुहम्मद वसीमने 37 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी केली. तसेच, राहुल चोप्राने 35 चेंडूत 52 धावा केल्या. या विजयासह अफगाणिस्तानने त्रिकोणी मालिकेत आपला पहिला विजय नोंदवला.