ENG vs SA (Photo Credit- X)

England National Cricket Team vs South Africa National Cricket Team, 1st ODI Match 2025: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (ENG vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिका 2025 चा पहिला सामना आज, 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असून, युवा वेगवान गोलंदाज सोनी बेकरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. या मालिकेमध्ये इंग्लंड संघाची कमान हॅरी ब्रूकच्या खांद्यावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहेत.

संघ स्थिती आणि अलीकडील कामगिरी

हॅरी ब्रूकने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून इंग्लंडचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघही शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच भूमीत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभूत केले होते. डेव्हिड मिलर आणि मार्को यानसन यांसारख्या अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्यामुळे त्यांचा संघ अधिक मजबूत झाला आहे. आयसीसी वनडे संघ क्रमवारीत सध्या इंग्लंड ८८ रेटिंगसह ८व्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका ९८ रेटिंगसह ६व्या स्थानावर आहे.

हे देखील वाचा: Mitchell Starc T20I Retirement: मिचेल स्टार्कचा T20 क्रिकेटला 'रामराम', आता कसोटी आणि वनडेवर लक्ष केंद्रित करणार

हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 71 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेने 35 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर इंग्लंडला 30 सामन्यांत यश मिळाले आहे. पाच सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला. या मालिकेत इंग्लंड आपला रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल.

लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड (FanCode) ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): रयान रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, मॅथ्यू ब्रीत्झके, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, वियान मुल्डर, कॉर्बिन बॉश, कगिसो रबाडा, केशव महाराज, क्वेना माफाका.

इंग्लंड (घोषित प्लेइंग इलेव्हन): जेमी स्मिथ, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर, जेकब बेथेल, विल जॅक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि सोनी बेकर.