Rape Threats to Vamika: विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराच्या धमकीबाबत दिल्ली महिला आयोग गंभीर; पोलिसांना पाठवली नोटीस
File Image of Virat Kohli (Photo Credits: IANS)

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानकडून दारूण पराभव झाला. त्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य करण्यात आले. शमीच्या धर्मावर निशाणा साधत काही यूजर्सनी त्याला देशद्रोही संबोधले. नंतर शमीच्या समर्थनार्थ कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) समोर आला. आता सोशल मीडियावर ट्रोलर्स कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य करत आहेत. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर, काही लोकांनी विराट कोहलीच्या मुलीला आणि कुटुंबाला धमकावले असल्याचे समोर आले आहे. एका युजरने विराटची 10 महिन्यांची मुलगी वामिकाला (Vamika) बलात्काराची (Rape) धमकी दिली आहे.

हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या युजरवर कडाडून टीका केली आहे. आता दिल्ली महिला आयोगाने याप्रकरणी गंभीर भूमिका घेतली आहे. या संदर्भात डीसीडब्ल्यूच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना पत्र लिहून आरोपींवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी जारी करण्यात आलेल्या नोटीसद्वारे, डीसीडब्ल्यूने दिल्ली पोलिसांकडून या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरची माहिती देखील मागितली आहे. दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडून, कोणत्या आरोपींची ओळख पटली आणि त्यांना अटक करण्यात आली का, याबाबत लेखी माहिती मागवली आहे.

DCW च्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी विचारले आहे की, जर आरोपींना अटक झाली नसेल तर दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती द्यावी. यासंदर्भात आयोगाने दिल्ली पोलिसांकडून 8 नोव्हेंबरपर्यंत सविस्तर अहवाल मागवला आहे. (हेही वाचा: Anil Deshmukh यांना ED कस्टडी दरम्यान Special PMLA Court कडून घरगुती जेवण आणि औषधं पुरवण्यास परवानगी)

दरम्यान, ट्रोलर्सनी क्रिकेटपटूंच्या कुटुंबावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. आयपीएलमधील अपयशानंतर ट्रोलर्सनी धोनीची पत्नी साक्षीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांची 5 वर्षांची मुलगी जीवाला बलात्काराची धमकी दिली होती. याप्रकरणी कच्छमधून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. आरोपी 16 वर्षांचा आणि इयत्ता 11वीचा विद्यार्थी होता.