इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 नंतर टीम इंडियाचे (Team India) आंतरराष्ट्रीय सामना सुरु होणार आहेत. तर देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित, रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीचे (Ranji Trophy Knockouts) सामने सुरु होणार आहेत. जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या रणजी चषकच्या नॉकआऊट सामन्यासाठी मुंबईचा संघ (Mumbai Squad) घोषित करण्यात आला आहे. क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) जूनमध्ये होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आले आहे. यापूर्वी अर्जुनला आयपीएल (IPL) 2022 च्या संपूर्ण सीझनमधेही बेंचवर बसावे लागले होते. पृथ्वी शॉ च्या (Prithvi Shaw) नेतृत्वाखालील संघ बेंगलोर येथे बाद फेरीत उत्तराखंडशी भिडणार आहे. (Ranji Trophy Knockouts New Schedule: रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीचे नवे वेळापत्रक BCCI कडून जारी, सर्व सामने दोन दिवसांनी लांबले)
अर्जुनला वगळण्यात आले असले तरी संघात सलामीवीर यशस्वी जयस्वाल, अनुभवी धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे, खांद्याच्या दुखापतीमुळे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे बाहेर पडला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुनने अद्याप प्रथम श्रेणी पदार्पण केलेले नाही. अर्जुनला आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांत खरेदी केले होते परंतु सलग आठ सामने गमावल्यानंतर MI लवकर विजेतेपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही त्याला एकही सामना खेळता आला नाही. दरम्यान, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान आणि त्याचा 18 वर्षीय भाऊ मुशीर, या दोन भावांचा नॉकआऊट सामन्यांसाठी मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर आणि डावखुरा फिरकीपटू, मुशीरने कूचबिहार ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे.
सलील अंकोला यांच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने आणि गुलाम पारकर, सुनील मोरे, प्रसाद देसाई आणि आनंद याल्विगी यांचा समावेश असून भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफरचा पुतण्या अरमान जाफरचीही बाद फेरीसाठी निवड केली आहे.
मुंबईचा संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, भूपेन लालवानी, अरमान जाफर, सरफराज खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, अमन खान, साईराज पाटील, शम्स मुलाणी, ध्रुमिल मतकर, तनुष कोटियन, शशांक अत्तर्डे, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्तान डायस, सिद्धार्थ राऊत, मुशीर खान.