Chetan Sakariya's Father Passes Away: चेतन सकारियाला 5 महिन्यात दुसरा मोठा धक्का, भावाच्या मृत्युनंतर वडिलांचे कोरोनामुळे निधन
Chetan Sakariya (Photo Credit: Twitter)

संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना क्रिडा विश्वातून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. आयपीएल 2021 दमदार कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज चेतन सकारिया (Chetan Sakariya) याच्या वडिलांचे आज (9 मे) कोरोनामुळे निधन झाले आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ही माहिती दिली आहे. सकारिया याच्या वडिलांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, "कोरोना विरुद्ध लढाईत चेतन सकारियाचे वडील कानजीभाई सकारियांचा पराभव झाल्याचे ऐकून अत्यंत वाईट वाटले. आम्ही चेतन साकारिया यांच्या संपर्कात आहोत आणि या कठीण परिस्थितीत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न करू." हे देखील वाचा- MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पत्नी साक्षीने शेअर केला व्हिडिओ

ट्वीट-

आयपीएल 2021 मध्ये सकारियाने आक्रमक गोलंदाजीच्या जिवावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयपीएलचा चौदावा हंगामात राजस्थानचा संघ गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये नसला तरी, सकारियाने आपल्या गोलंदाजी आणि भव्य क्षेत्ररक्षणातून सर्वांना वेड लावले आहे. त्याने या हंगामात 7 सामन्यात 7 विकेट्स पटाकवले आहेत. या विकेट्समध्ये महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना आणि केएल राहुल यांसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे.