Sri Lanka टेस्टआधी पाकिस्तान बोर्डाने मिसबाह-उल-हक याला बनवले प्रशिक्षण शिबिराचा कमांडंट, NCA येथे शिबिरासाठी 20 खेळाडूंची नावे जाहीर
(Photo: @TheRealPCB/Twitter)

माजी कर्णधार मिसबाह-उल-हक (Misbah-ul-Haq) याला पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाच्या 17 दिवसांच्या शिबिरासाठी कॅम्प कमांडंट बनविण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आगामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आव्हानाची तयारी करण्यासाठी या मोसमाच्या आधी शिबिराचे आयोजन केले जात आहे. पाकिस्तानचा डोमेस्टिक सीजन कदाचित 12 सप्टेंबरपासून कायद-ए-आजम ट्रॉफी पासून सुरू होईल. या शिबिरासाठी 14 केंद्रीय करारातील खेळाडू आणि सहा अतिरिक्त खेळाडूंना बोलाविण्यात आले आहे. 19 ऑगस्ट रोजी सर्व लाहोरमधील नॅशनल स्पोर्ट्स अकादमी (NCA) येथे पोहचतील. (PCB चा कोच मिकी आर्थर यांना राम-राम, माजी क्रिकेटपटूने दिली 'ही' प्रतिक्रिया)

दोन दिवसांच्या फिटनेस टेस्टनंतर हे शिबिर 22 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 7 सप्टेंबरपर्यंत चालेल. मिसबाह या शिबिरासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करेल. पीसीबीने नुकताच निर्णय घेतला होता की ते प्रशिक्षक मिकी आर्थर (Mickey Arthur) आणि संपूर्ण प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ वाढवणार नाहीत. मिस्बाह यांना ही नोकरी दिली जाऊ शकते अशी पाकिस्तानी मिडियामध्ये सध्या चर्चा सुरु आहे. टेस्ट चॅम्पियनशिप सुरू झाल्यामुळे श्रीलंक विरुद्ध दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान आपला सर्वोत्तम संघासह जावे अशी पीसीबीची इच्छा आहे.

केंद्रीय करारबद्ध क्रिकेटपटू: हॅरिस सोहेल, अझर अली, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, सरफराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान शिनवारी, वहाब रियाज आणि यासिर शाह.

करार नसलेले खेळाडूः असिफ अली, बिलाल असिफ, इफ्तिखार अहमद, मीर हमजा, राहत अली, आणि जफर गोहर.