NZ vs PAK 2nd Test: केन विल्यमसनचा मास्टर स्ट्रोक! न्यूझीलंड कर्णधार 2021 चा ठरला पहिला शतकवीर, टेस्ट मॅचमध्ये झळकावले सलग तिसरे शतक
न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

NZ vs PAK 2nd Test: न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळवत वर्ष 2020 संपुष्टात आणले आणि नवीन वर्षाचा पहिला आंतरराष्ट्रीय शतकवीर म्हणून त्याने 2021 ची सुरुवात केली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात क्राइस्टचर्च (Christchurch) येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विल्यमसनने 175 चेंडूंत 112 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने आतापर्यंत 16 चौकार ठोकले. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील 297 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाखेर 3 बाद 286 धावा करत स्थिती आपल्या नियंत्रणात ठेवली आहे. विल्यमसनने चौथ्या विकेटसाठी हेन्री निकोल्ससह 215 धावांची नाबाद भागीदारी केली. निकोल्स दिवसाखेर 186 चेंडूत 89 धावांवर नाबाद परतला. डावाच्या 70व्या षटकात किवी कर्णधाराने 78 पासून 94 धावांपर्यंत मजल मारली आणि आक्रमकता दाखवत नसीम शाहच्या चेंडूवर चार चौकार ठोकले. (NZ vs PAK 2nd Test: नसीम शाह आणि मोहम्मद अब्बास यांच्यातील मजेदार संभाषण स्टंप माइकमध्ये कैद, ऐकून डोक्याला हात माराल! Watch Video)

विल्यमसनने लवकरच फहीम अशरफच्या चेंडूवर फाईन लेगवर चौकार मारत सलग तिसऱ्या शतकासह 24वे कसोटी शतक झळकावले. यापूर्वी, त्याने हॅमिल्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक 251 धावांपर्यंत मजल मारली होती आणि पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात Mount Maunganui येथे 129 धावा केल्या होत्या. विल्यमसनच्या नावावर आता 24 कसोटी शतके आणि 32 अर्धशतक आहेत. 31 डिसेंबर रोजी आयसीसीची नवीनतम फलंदाजी क्रमवारीत विल्यमसन कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकावर पोहोचला. विल्यम्सनकडे 890 गुण आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 879 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे तर स्टीव्ह स्मिथची 877 गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर पहिल्या डावात पाकिस्तान संघ 297 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात किवी संघाने 85 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून 286 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडे अजूनही 11 धावांची आघाडी आहे, परंतु यजमान किवी संघाकडे 7 विकेट शिल्लक आहेत आणि विल्यमसन 112 व निकोल्स 89 धावा करून नाबाद खेळत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी संघावर दबाव बनला असेल. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचा विरोधी संघाचा प्रयत्न असेल.