Kane Williamson Ruled 0ut: एकदिवसीय मालिका आधीच न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे केन विल्यमसन सुरुवातीच्या 2 सामन्यांना मुकणार
केन विल्यमसन (Photo Credit: Twitter/ICC)

भारतीय संघाविरूद्ध टी-20 सामना गमवल्यानंतर, न्यूझीलंडच्या संघाच्या चिंतेत आणखी भर पडल्याचे दिसत आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे भारत विरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील (India Vs New Zealand ODIs) सुरुवातीच्या 2 सामन्यात केन विल्यमसनला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. केन विल्यमसनच्या जागेवर मार्क चॅपमॅनला संधी देण्यात येणार आहे तर, विकेटकीपर टॉम लाथम यांच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान विल्यमसनला दुखापत झाली होती. यामुळे विल्यमसनच्या बदली अनभुवी गोलंदाज टीम साऊदीने चौथ्या टी-20 सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. भारतीय संघाने टी-20 मालिकेत चांगली कामगिरी करत त्यांच्याच देशात त्यांना 5-0 फरकाने पराभूत केले. दरम्यान, न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघाने टी-20 मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. टी-20 मालिकेत मोठा पराभव वाट्याला आल्यानंतर न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का लागला आहे. दुखापतीमुळे केन विल्यमसन सुरूवातीच्या 2 एकदिवसीय सामन्यात खेळणार नाहीत, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. हे देखील वाचा- Rohit Sharma Ruled Out: भारतीय संघाला मोठा झटका; रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर

एएनआयचे ट्वीट-

टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडचा संघ कसे पुनरागमन करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.