प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

क्रिकेट विश्वात नेपाळ (Nepal) आणि मालदीव (Maldives) या दोन्ही संघांचे सामने काही मोठी गोष्ट नाही. पण गोलंदाज अंजली चंद (Anjali Chand) हिने मालदीवविरुद्ध झालेल्या दक्षिण आशियाई खेळातील (South Asian Games) सामन्यात प्रभावी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोखरामधील आंतरराष्ट्रीयटी-20 सामन्यात नेपाळने मालदीवला 10 विकेटने पराभूत केले. आणि मालदीवची परिस्थिती आणखी खराब करण्यासाठी नेपाळच्या गोलंदाजांनी 11 ओव्हरमध्ये केवळ 16 धावांवर मालदीव संघाला ऑल आऊट केले. यजमान नेपाळ संघाला हे लक्ष्य पूर्ण करण्यास जास्त काळ लागला नाही आणि फक्त 5 चेंडूत मिळालेले लक्ष्य गाठत विजय मिळवला. नेपाळच्या विजयात अंजली चंदने महत्वाची भूमिका बजावली. अंजलीने मालदीवविरुद्ध 0 धावा देऊन 6 विकेट घेतले आणि आंतरराष्ट्रीयटी-20 क्रिकेटमध्ये एका नवीन विश्वविक्रमाची नोंद केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (महिला आणि पुरुष) गोलंदाजाने केलेली सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची अंजलीने नोंद केली आहे. यापूर्वी, मालदीवच्या मास अलिस्सा हिने यावर्षी चीनविरुद्ध 3 धावांवर 6 विकेट्स घेतल्या  होत्या. या टी-20 सामन्यात 24 वर्षीय अंजलीने 2.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्स घेतल्या. करुणा भंडारी हिनेही 2 गडी बाद केले. अंजलीने 3 फलंदाज बोल्ड केले, 1 झेलबाद आणि 1 स्टंप आऊट केले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ती अंजलीचा हा पहिला टी-20 सामना होता. या स्पर्धेत नेपाळ, मालदीव, बांग्लादेश आणि श्रीलंका संघ खेळत आहेत. राऊंड रॉबिन फेरीनंतर 4 संघांपैकी सर्वोत्तम 2 संघ सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी एकमेकांच्या आमने-सामना येतील.

दुसरीकडे, पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये भारताच्या दीपक चाहर याने यंदा बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात 10 नोव्हेंबरला 7 धावांवर 6 विकेट्सची नोंद केली होती. चाहरपूर्वी श्रीलंकेचा रहस्यमय फिरकीपटू अजंथा मेंडिस याने 8 धावांवर6 गडी बाद करण्याची नोंद केली होती.