स्पॉट फिक्सिंग प्रकरणात माजी पाकिस्तानी फलंदाज नासिर जमशेद दोषी, दोन खेळाडूंना दिली होती लाच; पुढील वर्षी ठोठावली जाईल शिक्षा
नासिर जमशेद (Photo Credits: Getty Images)

पाकिस्तानचा माजी फलंदाज नासिर जमशेद (Nasir Jamshed) टी-20 स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) प्रकरणात सहकारी क्रिकेटपटूंना लाच देण्याच्या कारस्थानात गुंतल्याचा दोषी आढळला आहे. नासिरनेही आपली चूक मान्य केली आहे. 33 वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटपटूवर इंग्लंडच्या कोर्टात खटला चालू आहे. जमशेदने यापूर्वी हा आरोप नाकारला होता, परंतु सोमवारी इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी आपली बाजू बदलली. या प्रकरणातील उर्वरित आरोपी युसुफ अन्वर आणि मोहम्मद एजाज यांनी खटला सुरू होण्यापूर्वीच जमशेदला लाच देण्याचे मान्य केले होते. हे प्रकरण पाकिस्तान सुपर लीग (PSL) संबंधित आहे. या प्रकरणात शिक्षेची सुनावणी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होईल. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की 2016 मध्ये बांग्लादेश प्रीमियर लीगमध्येही फिक्सिंगचा प्रयत्न केला होता, तर पाकिस्तान सुपर लीग 2017 मधील सामने फिक्स केले गेले होते. दोन्ही प्रकरणांमध्ये, या सलामी फलंदाजाने षटकातील पहिल्या दोन चेंडू धावा केल्या नाहीत, ज्याच्यासाठी त्याला पैसे देण्यात आले होते.

पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर झाल्मी यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान बाकीच्या खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगसाठी त्याने प्रोत्साहित केले होते. अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी सामना होण्यास परवानगी दिली. सामन्यात शारजील खान याने पहिले दोन चेंडू खेळले नाहीत.

यापूर्वी ऑगस्ट 2018 मध्ये स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणाने जमशेदवर 10 वर्षे बंदी घातली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी कोडच्या (पीसीबी) सात कलमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नासिरवर करण्यात आला होता. त्यापैकी न्यायाधिकरणाने नासेरला पाचमध्ये दोषी ठरवले होते. 2017 च्या सुरुवातीला जेव्हा क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली तेव्हापासून जमशेद पीसीबीच्या रडारवर होते. फेब्रुवारी 2017 मध्ये त्याला यूकेमध्ये अटक करण्यात आली होती. अ‍ॅन्टी करप्शन ट्रिब्यूनलने पीएसएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य न केल्याचा दोषी आढळल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये पीसीबीने जमशेदवर एक वर्षाची बंदी घातली होती जी एप्रिल 2018 मध्ये काढण्यात आली.