Ramchandra Guha Allegations on BCCI: 'अमित शाह, एन श्रीनिवासन भारतीय क्रिकेट चालवतायेत, तर सौरव गांगुली पैशांचा भुकेला', रामचंद्र गुहा यांचे गंभीर आरोप
प्रशासक समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा (Photo Credit: Facebook)

Ramchandra Guha Allegations on BCCI: प्रशासक समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी भारतीय क्रिकेट (Indian Cricket) नियामक मंडळावर काही मोठे आरोप लावले आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये नातलगतावाद ही मुख्य चिंता आहे असा दावा प्रसिद्ध इतिहासकार यांनी केला आहे. 2017 मध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने CoAच्या सदस्यांपैकी एक म्हणून नेमलेल्या गुहा यांनी बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता सुनिश्चित करण्याचे काम केले. लवकरच, वैयक्तिक कारणे सांगून ते पदावरून पायउतार झाले. त्यांचे नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक- ‘The Commonwealth of Cricket: A Lifelong Love Affair with the Most Subtle and Sophisticated Game Known to Humankind’ हे भारतीय क्रिकेट प्रशासनातल्या त्यांच्या कारकीर्दीची झलक दाखवते. (BCCI National Selection Panel: मनिंदर सिंह, चेतन शर्मा यांनी राष्ट्रीय निवड समितीच्या पदासाठी केला अर्ज; अजित आगरकरही मैदानात उतरण्याची शक्यता)

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत गुहा यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन आणि गृहमंत्री अमित शाह ‘भारतीय क्रिकेट’ चालवत असल्याचा आरोप केला. “एन श्रीनिवासन आणि अमित शहा आज प्रभावीपणे भारतीय क्रिकेट चालवत आहेत. राज्य संस्था कुणाची मुलगी, कुणाच्या मुलाद्वारे चालविली जात आहे. बीसीसीआय पूर्णपणे षड्यंत्र आणि नातेसंबंधात बुडाली आहे आणि रणजी करंडक खेळाडूंना त्यांचे थकीत देय देण्यास मोठा विलंब होत आहे. ज्या सुधारणांची अपेक्षा होती, ती कधी झाली नाही,” रामचंद्र गुहा म्हणाले. हितसंबंधांच्या संघर्षाबद्दलही गुहा यांनी मत स्पष्ट केले आणि भारतीय क्रिकेट व्यवस्थापनात हा एक शाप असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, “सर्वात मोठा शाप नाही; हा शाप आहे. आज गांगुलीला पाहा, खेळाचे प्रतिनिधित्व करणारे बोर्डाचे प्रमुख काही फँटसी क्रिकेटचे प्रतिनिधित्व करत आहेत.” भारतीय क्रिकेटपटूंमध्ये पैशांचा असा लोभ धक्कादायक आहे, असेही गुहा म्हणाले.

“माझ्या पुस्तकात माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांची कथा आहे. या कथेत बिशन सिंह म्हणातात की, अफगाणिस्तानच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी काबूलला जाण्यासाठी मी आनंदी आहे. तो क्रिकेटसाठी कुठेही जाऊ शकतो मात्र पैशांसाठी नाही. थोड्या जास्त पैशांसाठी गांगुलीने हे सर्व करावे का? जर बोर्डाचे अध्यक्ष असे वागत असतील तर नैतिक मानक कमी होतील,” गुहा यांनी पुढे म्हटलं.