विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) गट अ आणि ब सामन्यात बुधवारी, 16 ऑक्टोबरला मुंबईने झारखंडला 39 धावांनी पराभूत केले. मुंबई संघाच्या या विजयात 17 वर्षीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्या तुफानी दुहेरी शतकाने मोलाचा वाटा निभावला. यशवीने 154 चेंडूंत 17 चौकार आणि 12 षटकारांसह 203 धावांचे शानदार खेळी केली. यशस्वीने एका डावात तुफान खेळीच्या जोरावर अनेक विक्रमांना गवसणी घातली. लिस्ट ए मध्ये दुहेरी शतक करणारा यशस्वी सर्वात युवा फलंदाज बनला. त्याने फक्त 149 चेंडूत दुहेरी शतक पूर्ण केले. आणि यासह त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एक नवीन इतिहास लिहिला आहे. यशस्वीने मागील 5 डावात शानदार प्रदर्शन केले आहे. आणि या डावात 504 धावा केल्या. त्यामुळे पुढे जाऊन यशस्वीला त्याच्या जबरदस्त फलंदाजीने असेच यश मिळाले तर यात कोणतीही शंका नसेल. आणि भारताला सचिन तेंडुलकर यांच्यानंतर अजून एक मास्टर-ब्लास्टर फलंदाज मिळेल. (विजय हजारे ट्रॉफीमध्ये 17 वर्षीय मुंबईच्या यशस्वी जयस्वाल याचा डबल धमाका, झारखंड संघाविरुद्ध केले शानदार दुहेरी शतक)
यशस्वीच्या यशात मास्टर-ब्लास्टर सचिनचे महत्वाचे योगदान आहे. यशस्वी आणि सचिनचा मुलगा अर्जुन चांगले मित्र आहे. आणि अर्जुनने एकदा यशस्वीची ओळख वडील सचिनशी करून दिली होती. यादरम्यान, यशस्वीच्या प्रतिभाने प्रभावित होऊन सचिनने त्याला बॅट भेट म्हणून दिली. आणि याच बॅटने यशस्वीने दुहेरी शतक ठोकले. दरम्यान, यशस्वीने यंदा मुंबईसाठी 5 सामने खेळले आहेत. यापूर्वी त्याने 2 शतकदेखील केले आहेत. यशवीने केरळविरुद्ध 122 तर गोव्याविरुद्ध 113 धावा केल्या. या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईच्या या डाव्या हाताच्या फलंदाजाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
लिस्ट अ क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा हा भारताचा 7 वा आणि मुंबईचा तिसरा फलंदाज आहे. काही दिवसांपूर्वी संजू सॅमसननेही हा पराक्रम केला होता. सॅमसनने केरळसाठी गोवा संघाविरुद्ध ही कामगिरी केली होती.