विजय हजारे ट्रॉफीमध्ये 17 वर्षीय मुंबईच्या यशस्वी जयस्वाल याचा डबल धमाका, झारखंड संघाविरुद्ध केले शानदार दुहेरी शतक
यशस्वी जयस्वाल (Photo Credit: Twitter)

भारतीय घरगुती क्रिकेटमध्ये एक नवीन क्रिकेटपटू उदयास येत आहे. यामध्ये भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाचा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याची बरीच प्रशंसा केली जात आहे. उत्तर प्रदेशचा यशस्वी जयस्वाल मुंबई (Mumbai) कडून घरगुती सामने खेळत आहे. यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) साठी मुंबईच्या स्टार संघात या 17 वर्षीय फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. आणि सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत यशस्वीने डबल धमाका केला आह. झारखंड (Jharkhand) संघाविरुद्ध सुरु असलेल्या मॅचमध्ये यशस्वीने दुहेरी शतक केले आहे. यशस्वीने 149 चेंडूत शानदार दुहेरी शतक करण्याचा पराक्रम केला आहे. लिस्ट अ क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा हा भारताचा 7 वा आणि मुंबईचा तिसरा फलंदाज आहे. काही दिवसांपूर्वी संजू सॅमसननेही हा पराक्रम केला होता. (विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजू सॅमसन याचे दुहेरी शतक; लिस्ट ए क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा सह 'या' यादीत झाला समावेश)

शिवाय, लिस्ट ए क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने 149 चेंडूत 12 षटकार आणि 17 चौकारांच्या मदतीने दुहेरी शतक पूर्ण केले. अखेरीस यशस्वी 154 चेंडूंत 203 धावांवर बाद झाला. यशस्वी मुंबई संघासाठी डावाची सुरुवात करतो आणि आज त्याला संघासाठी पाचवा सामान खेळण्याची संधी मिळाली होती. मुंबईसाठी खेळलेल्या या सामन्यांमधील यशस्वीचे तिसरे शतक आहे. यापूर्वी, त्याने गोव्याविरुद्ध 113 आणि केरळकडून 122 धावा केल्या होत्या. या दुहेरी शतकासह यशस्वीने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये केवळ 5 सामन्यात 500 धावा करुन आपली क्षमता दर्शविली आहे.

यशस्वीच्या दुहेरी शतकाच्या जोरावर मुंबई संघाने 50 ओव्हरमध्ये 358 धावा केल्या. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी संजू सॅमसन यानेदेखील दुहेरी शतक झळकावले होते.सॅमसनने केरळसाठी गोवा संघाविरुद्ध ही कामगिरी केली होती.