(Photo Credits: IPL)

येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरु होणा-या IPL 2021 च्या पहिल्या सामन्यापूर्वीच या स्टेडियमवरील 8 कर्मचा-यांना करोनाची लागण झाली आहे. ही बातमी क्रिकेटप्रेमींसाठी आणि आयोजकांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. वानखेडे स्टेडियमवरील 8 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वच चिंतेत आहे. IPL साठी निवडलेल्या 10 ठिकाणांपैकी मुंबईचे नावही सामिल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैदानावर काम करणारे कर्मचारी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे हे कोरोना संक्रमित होण्याचे कारण मानले जात आहे. म्हणूनच मुंबई क्रिकेट असोसिएशनने आता निर्णय घेतला आहे की, या कर्मचा-यांना IPL 2021 संपेपर्यंत स्टेडियमवरच राहण्याची व्यवस्था केली जाईल.हेदेखील वाचा- IPL 2021 Schedule in PDF for Free Download: इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या सीजन मधील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या वेळ आणि ठिकाण

येत्या 9 एप्रिलला IPL 2021 क्रिकेट सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान 10 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे सावटही त्यांच्यावर आहे.

"वानखेडेवर होणा-या आयपीएल सामन्यांसाठी आम्ही तयार असून चिंतेची कारण नाही" असे MCA चे अधिकारी म्हणाले आहेत. आयपीएल सामना संपेपर्यंत आपण ग्राउंडवर असलेल्या रुम्समध्ये येथील कर्मचा-यांची राहण्याची व्यवस्था करणार आहे.

दरम्यान माजी भारतीय फलंदाज एस. बद्रीनाथ (S Badrinath) कोरोना (Coronavirus) पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. खुद्द बद्रीनाथने रविवारी ट्विटरवरुन ही माहिती जाहीर केली. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. बद्रीनाथपूर्वी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि युसुफ पठाण (Yusuf Pathan) यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे तीनही खेळाडू छत्तीसगडच्या रायपूर येथे अलीकडेच झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे जेतेपद जिंकणार्‍या इंडिया लेजेंड्स संघाचे सदस्य होते.