MI W (Photo Credit - X)

MI vs GG WPL 2025 Eliminator Match: महिला प्रीमियर लीग 2025 चा एलिमिनेटर सामना आज 13 मार्च रोजी मुंबई इंडियन्स महिला क्रिकेट संघ (WPL) विरुद्ध गुजरात जायंट्स महिला क्रिकेट संघ (WPL) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा 47 धावांनी पराभव करत महिला प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना दिल्ली आणि मुंबई मध्ये रंगणार आहे. तत्तपुर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत गुजरातसमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ 19.2 षटकात 166 धावा करुन गारद झाला.

हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रंटची स्फोटक खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. यास्तिका भाटिया स्वस्तात बाद झाली, पण हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी ज्या पद्धतीने गुजरातच्या गोलंदाजांना मारहाण केली त्यावरून हे स्पष्ट झाले की संपूर्ण एमआय संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आहे. मॅथ्यूज आणि ब्रंट दोघांनीही 77 धावा केल्या आणि मिळून 133 धावांची मोठी भागीदारी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर देखील आज वेगळ्याच मूडमध्ये दिसली. ती येताच हरमनप्रीतने 12 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 36 धावांची शानदार खेळी केली. गुजरात जायंट्सकडून डॅनियल गिब्सनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

हेली मॅथ्यूजने सर्वाधिक घेतल्या तीन विकेट्स 

लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात जायंट्सची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर बेथ मुनी अवघ्या सहा धावा करून बाद झाली. गुजरात जायंट्सचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत फक्त 166 धावा करून सर्वबाद झाला. गुजरात जायंट्सकडून डॅनियल गिब्सनने 34 धावांची स्फोटक खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, डॅनियल गिब्सनने 24 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारला. डॅनियल गिब्सन व्यतिरिक्त, फोबी लिचफिल्डने 31 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. हेली मॅथ्यूज व्यतिरिक्त अमेलिया केरने दोन विकेट घेतल्या.

मुंबई दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

WPL च्या इतिहासात मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, एमआय संघाने WPL 2023 चा अंतिम सामना खेळला आणि दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव करून विजेतेपद जिंकले. आता 15 मार्च रोजी अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. दिल्लीने आतापर्यंत तीन वेळा महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.