MS Dhoni In T20 World Cup: शोएब अख्तरची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी, एमएस धोनीला फोन करुन टी-20 वर्ल्ड कप खेळायची विनंती करावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, एमएस धोनी आणि शोएब अख्तर (Photo Credit: Facebook)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) 15 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर भावनिक व्हिडिओद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक्सिट घेतली. त्याच्या जाण्याने राष्ट्रीय संघात निःसंशयपणे एक मोठी जागा रिकामी झाली आहे विशेषत: आयसीसीच्या (ICC) स्पर्धांमध्ये. मात्र, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला (Shoaib Akhtar) धोनी 2021 टी-20 विश्वचषक (T20 World Cup) खेळताना दिसत आहे. अख्तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सक्रिय क्रिकेटींग गुरु आहे. तो नियमितपणे आपल्या यूट्यूब चॅनलवरून खेळावर आपले मत शेअर करत राहतो. धोनीच्या निवृत्तीचा निर्णय ऐकल्यानंतर अख्तर म्हणाला की धोनीकडे अजूनही भारतासाठी सर्वात कमी फॉर्मेट खेळण्याची क्षमता आहे. “मला वाटते की तो टी-20 क्रिकेट खेळू शकला असता, तो टी-20 विश्वचषक खेळू शकला असता. आणि ज्याप्रकारे भारत आपल्या स्टार्सना आधार देतो, त्यांच्यावर ते प्रेम करतात व त्यांना ओळखतात, त्याने टी-20 खेळले असते. पण ही त्याची वैयक्तिक निवड होती,” ‘बोलवासीम’ या यूट्यूब चॅनलशी बोलताना शोएब म्हणाला. (एमएस धोनीने वानखेडे स्टेडियममध्ये ज्या जागी मारला 2011 वर्ल्ड कप विजयी सिक्स, तिथे त्याला मिळू शकते लाइफटाइम सीट)

धोनी 2020 टी-20 विश्वचषक खेळू पाहत होता परंतु कोरोना व्हायरसने स्पर्धा पुढे ढकलण्याने त्याला आणखी एक वर्ष प्रतीक्षा करणे योग्य वाटले नाही आणि हा मोठा निर्णय घेतला असल्याचं अनेकजणांचे म्हणणं आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर विचारले तर धोनी पुढच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकेल असे अख्तरला वाटते. “पंतप्रधान आपल्याला कॉल करू शकतात आणि त्याला टी-20 विश्वचषक खेळण्याची विनंती करू शकतात, आपण काही सांगू शकत नाही. तेही शक्य आहे. इमरान खान यांना जनरल झिया-उल-हक यांनी 1987 नंतर क्रिकेट न सोडण्यास सांगितले होते आणि तो खेळला. आपण पंतप्रधानांना नाही म्हणू शकत नाही,” असे अख्तरने पुढे म्हटले.

अख्तरला असेही वाटले की संपूर्ण देशाने त्याच्यासाठी एक निरोप सामना आयोजित केला पाहिजे, पण आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्लानुसार धोनीने विदाई सामना मागितला नाही त्यामुळे ते शक्य नाही. जेव्हापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडला आहे तेव्हापासून त्याच्या विदाई सामन्यासाठी असंख्य मागण्या होत आहेत.