मोहम्मद शमी (Photo Credit: AP/PTI)

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) नुकताच खुलासा केला की त्याने 2015 ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित वर्ल्ड कप (World Cup) फ्रॅक्चर गुडघ्याने खेळला होता. त्या स्पर्धेत उमेश यादवनंतर शमीने भारताकडून (India) दुसऱ्या सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या, तर पूर्ण टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा तो चौथा गोलंदाज होता. त्याला दररोज वेदनासह गोलंदाजी करावी लागली, परंतु असे असूनही त्याने वर्ल्ड कप 2015 मध्ये चांगली गोलंदाजी केली. त्या स्पर्धेत शमीने 7 सामन्यांत 17.29 च्या सरासरीने 17 गडी बाद केले होते. त्याची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी 35 धावांत 4 विकेट होती. तो फक्त उमेशच्या मागे होता ज्याने त्याच्यापेक्षा एक सामना जास्त खेळला. उमेशने 17.83 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या होत्या. वर्ल्ड कप 2015 मधील आपल्या कामगिरीबद्दल शमी म्हणाला की, मैदानावर जाण्यापूर्वी डॉक्टर दररोज माझ्या गुडघ्यातून द्रव काढून टाकायचे. (ICC ने शेअर केलेल्या आकडेवारीत विराट कोहलीने पटकावले अव्वल स्थान, रोहित शर्माचा 'या' लिस्टमध्ये समावेश, पाहा)

"2015 विश्वचषकात मला गुडघ्यात दुखापत झाली होती. संपूर्ण स्पर्धेत खेळलेल्या सामन्यांनंतर मी चालू शकत नव्हतो. नितीन पटेल (Nitin Patel) यांच्या आत्मविश्वासामुळे मी 2015 चा विश्वचषक खेळलो. पहिल्या सामन्यातच गुडघा तुटला. माझी मांडी आणि गुडघे समान आकाराचे होते, डॉक्टर दररोज त्यांच्याकडून द्रव बाहेर काढत असत. मी तीन पेन किलर्स घ्यायचो, " बुधवारी इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान शमीने माजी भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाण याला सांगितले.

दुखापत असूनही त्या स्पर्धेत खेळण्याचे श्रेय शमीने महेंद्र सिंह धोनीला दिले. सिडनी क्रिकेट मैदानावर सेमीफायनल सामना खेळण्यासाठी धोनीने त्याला प्रेरित केल्याचे शमी म्हणाला. शमी म्हणाला, “उपांत्य सामन्यापूर्वी मी संघाला सांगितले की मी खेळू शकणार नाही, मला खूप वेदना होत आहे. मी टीम मॅनेजमेंटशी चर्चा केली. माही भाई आणि संघ व्यवस्थापनानेही मला आत्मविश्वास दिला." दुसर्‍या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 328 धावा केल्या होत्या आणि भारताचा संपूर्ण संघ 233 धावांवर ऑलआऊट झाला.