'सचिन तेंडुलकर याला शोएब अख्तरच्या बॉलिंगवर घाबरताना पाहिलं!' 2006 कराची टेस्ट आठवण करत मोहम्मद असिफने केला दावा
मोहम्मद असिफ, सचिन तेंडुलकर (Photo Credit: getty)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा आजवर क्रिकेट खेळलेला सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत सचिनला बाद करणे हे प्रत्येक गोलंदाजांचे स्वप्न असायचे. एकेकाळी सचिन आणि शोएब अख्तर (Shoaib Akhter), या दोन खेळाडूंमध्ये बॅट-बॉलचा चांगलाच सामना रंगायचा. 2003 वर्ल्ड कप सामन्यात सचिनने शोएबची केलेली धुलाई सर्वांना परिचित असेलच. मात्र शोएबचा बाऊन्सर चेंडू खेळताना सचिन आपले डोळे बंद करायचा असा दावा माजी पाक खेळाडू मोहम्मद आसिफने (Mohammad Asif) केला आहे. 2006 मध्ये भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात खेळलेला कराची कसोटी सामना आसिफला आठवला. या सामन्यात माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने पहिल्या षटकात हॅटट्रिक घेत इतिहास रचला. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान कराची कसोटी सामना खेळला गेला आणि पाकिस्तानने तो सामना 341 धावांनी जिंकला. यापूर्वी 2004 मधील भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावरील सहवाग आणि भारतीय फलंदाजांनी केलेली धुलाई त्यांच्या मनात होती. (सचिन तेंडुलकरच्या वनडे दुहेरी शतकाबाबत दक्षिण आफ्रिकी डेल स्टेनचा सनसनाटी दावा, अंपायरवर लगावला आरोप)

पाकिस्तानी कार्यक्रम The Burgerz वर आसिफ म्हणाला, “जर तुम्हाला आठवत असेल तर 2006 मध्ये भारताने पाकिस्तानचा दौरा केला होता, त्याच्याकडे अत्यंत मजबूत फलंदाजीची क्रम होता. राहुल द्रविडने बऱ्याच धावा फटकावल्या. वीरेंद्र सहवागने आम्हाला मुल्तानमध्ये धुवून काढले. फैसलाबाद कसोटीत दोन्ही संघांनी मिळून 6000 धावा केल्या. भारतीय संघातल्या फलंदाजांना फॉर्म पाहून आम्ही थोडे चिंतेत होते. ज्यावेळी सामन्याला सुरुवात झाली त्यावेळी इरफान पठाणने पहिल्याच षटकात हॅटट्रीक घेतली आणि आमचा धीर खचला. कामरान अकमलने अखेरच्या फळीत थोडंस धैर्य दाखवत शतक झळकावलं आणि आम्ही 240 धावा केल्या. ज्यावेळी आमच्या गोलंदाजांची वेळ आली शोएब जबरदस्त गोलंदाजी करत होता. मी स्क्वेअर लेगला उभा होतो, शोएबचे एक-दोन बाऊन्सर खेळताना सचिनला डोळे बंद करुन घेताना मी पाहिलं आहे. त्या सामन्यात भारतीय फलंदाज बॅकफूटवर खेळत होता आणि आम्ही त्यांना पहिल्या डावात 240 धावाही करु दिल्या नाहीत. त्यावेळी आम्ही अक्षरशः पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला होता.”

भारताने सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानच्या 245 धावांच्या विरोधात 238 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने दुसऱ्या डावात 599 धावा केल्या आणि भारताला दुसऱ्या डावात 341 धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, या दौऱ्यावर भारत-पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील मुलतान आणि फैसलाबादमधील, पहिले दोन्ही समाने अनिर्णित राहिले. शेवटच्या सामन्यातही भारताने पहिल्या डावात पाकिस्तानवर दबाव आणला पण दुसऱ्या डावात केलेल्या धावांनी त्यांना पुन्हा सामन्यात आणले. अखेरीस पाकिस्तानने मालिका 1-0 ने जिंकली.