MI vs SRH IPL 2021 Match 9: रोहित शर्माचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, मुंबईच्या ‘पलटन’मध्ये झाला एक बदल
रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

MI vs SRH IPL 2021 Match 9: रोहित शर्माची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि डेविड वॉर्नरचे सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात आज आयपीएल 14 मधील 9वा सामना रंगणार आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितने टॉस जिंकून बटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 तर मुंबई संघात एक बदल झाला आहे. मुंबईने वेगवान गोलंदाज मार्को जानसेनच्या जागी अ‍ॅडम मिल्नेचा (Adam Milne) समावेश केला आहे. मिल्ने मुंबईकडून डेब्यू करत आहे. दुसरीकडे, आजच्या सामन्यात दुखापतीमुळे केन विल्यमसनला प्लेइंगे इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. दोन्ही संघांनी या मोसमात प्रत्येकी 2 सामने खेळले असून मुंबईने एक तर हैदराबादला या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (‘IPL 2021 लिलावात झहीर खानने नाव घेतलं व माझ्या डोळ्यात अश्रू आले,’ मुंबई इंडियन्सच्या युवा गोलंदाजानेने सांगितला भावनिक अनुभव)

हैदराबादने आजच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार मोठे बदल केले आहेत. रिद्धिमान साहा, जेसन होल्डर, टी नटराजन आणि शाहबाझ नदीम यांना हैदराबाद संघातून बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी विराट सिंह, अभिषेक शर्मा, खालील अहमद आणि मुजीब उर रहमान यांना खेळण्याची संधी मिळाली आहे. म्हणजेच हैदराबादसाठी डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोची जोडी डावाची सुरुवात करेल. त्यानंतर मनीष पांडे तिसऱ्या स्थानावर तर विराट सिंह चौथ्या आणि विजय शंकर पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरेल. दुसरीकडे, मुंबईने आपल्या संघात अधिक बदल न करता युवा वेगवान गोलंदाज मार्को जानसेनच्या ऐवजी अ‍ॅडम मिल्नेला पदार्पणाची संधी दिली आहे.

पहा मुंबई-हैदराबादचा प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंड बोल्ट आणि अ‍ॅडम मिल्ने.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, विराट सिंह, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विजय शंकर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, मुजीब उर रहमान आणि खालील अहमद.