पोलार्डची बाउंसरवर मजेदार प्रतिक्रिया (Photo Credit: Twitter)

MI vs RR IPL 2021: कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) हा खेळामधील एक महान व्यक्तिरेखा आहे हे सर्वच जाणून आहेत आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals) आयपीएलच्या (IPL) 24 व्या सामन्यादरम्यान त्याच्या मनोरंजक भूमिकेचा आणखी एक पुरावा मिळाला आहे. क्विंटन डी कॉकच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थानच्या 171 धावांच्या उत्तरात मुंबईने 18.3 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून 172 धावा करुन सामना जिंकला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये एक गमतीशीर घटना पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 18 व्या ओव्हरमध्ये राजस्थानच्या क्रिस मॉरिसचा (Chris Morris) चेंडू फलंदाजी करणार्‍या मुंबईचा अष्टपैलू पोलार्डच्या हेल्मेटला लागला त्यानंतर वेस्ट इंडियन अष्टपैलूने मजेदार प्रतिक्रिया देत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणले. (IPL 2021: अरेच्चा! आयपीएलच्या मागील 3 सामन्यात घडला 'हा' अजब योगायोग, जाणून घ्या नेमकं आहे तरी काय)

मॉरिसच्या या ओव्हरमधील तिसरा बॉल वेगवान बाउंसर टाकला जो पोलार्डच्या हेल्मेटला इतक्या वेगात आदळला होता की कदाचित तो जखमी झाला असता परंतु चेंडू त्याच्या हेल्मेटला लागून हळू वेगाने सीमेच्या दिशेने जाताना दिसला. यादरम्यान पोलार्ड देखील बॉलला उद्देशून बाउंड्री लाईनच्या दिशेने जाण्याचे हातवारे करून लागला. पोलार्डच्या मजेदार अक्शनने फक्त राजस्थानचा गोलंदाज मॉरिसच नाही तर सोशल मीडियावर यूजर्सच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. दरम्यान, मुंबईच्या विजयी खेळीत पोलार्डने 8 चेंडूत 16 धावांची नाबाद खेळी केली. पोलार्डच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहते देखील मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ शेअर करत आहेत.

नेटीझन्स देखील ट्विटरवर पोलार्डला चीअर करताना दिसले:

आपण पोलार्डवर प्रेम कसे करू शकत नाही?

आयपीएलमधील सर्वात मनोरंजक व्यक्ती

पोलार्ड खूप शक्तिशाली आहे!

जा जा जा जा!

पोलार्डने सांगितले व चेंडूने ऐकले!

मुंबई-राजस्थान संघातील सामन्याबद्दल बोलायचे तर क्विंटन डी कॉकच्या नाबाद 70 धावांच्या तुफान अर्धशतकी खेळीने संघाला पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतवले. राजस्थान संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 24 व्या सामन्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमवून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात डी कॉकने 12व्या ओव्हरमध्ये 35 चेंडूत मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. डी कॉकने कृणाल पांड्याच्या साथीने संघाला विजयाच्या जवळ नेले पण निर्णायक क्षणी कृणाल तंबूत परतला. अशास्थितीत डी कॉक आणि कीरोन पोलार्डच्या छोटेखानी खेळीने मुंबई इंडियन्सला हंगामातील तिसरा विजय मिळवून दिला.