IPL 2021: अरेच्चा! आयपीएलच्या मागील 3 सामन्यात घडला 'हा' अजब योगायोग, जाणून घ्या नेमकं आहे तरी काय
संजू सॅमसन (Photo Credit: PTI)

IPL 2021: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम (फिरोज शाह कोटला मैदान) येथे इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 24 वा सामना खेळला गेला. सामन्यात राजस्थानने पहिले फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 4 बाद 171 धावा केल्या. यामुळे मागील तीन सामन्यात घडलेला एक अजब योगायोग आयपीएलमध्ये (IPL) पाहायला मिळाला आहे. यंदाच्या आयपीएल 2021 हंगामात सलग तिसऱ्यांदा असे झाले की पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाने निर्धारित ओव्हरमध्ये 171 धावांपर्यंत मजल मारली आणि विरोधी संघाला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले. यापूर्वी, सीजन 14 मधील 22 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरोधात पहिले फलंदाजी करत 5 बाद 171 धावा केल्या होत्या आणि अवघ्या 1 धावेने विजय मिळवला. (MI vs RR IPL 2021 Match 24: Quinton de Kock ची स्फोटक बॅटिंग, मुंबईची राजस्थानवर 7 विकेटने मात)

त्यानंतर, कोटला मैदानात सहंनाई सुपर किंग्स विरोधात सनरायझर्स हैदराबादने पहिले फलंदाजी करून 3 विकेट गमावून 171 धावांपर्यंत मजल मारली होती. याच्या प्रत्युत्तरात चेन्नईने देखील 3 विकेट गमावून 173 धावा करून आयपीएलमध्ये पाचवा विजय मिळवला. त्यानंतर आज मुंबई इंडियन्स विरोधात राजस्थानने 24व्या सामन्यात 171 धावाच केल्या आहेत. त्यामुळे, यंदाच्या मोसमात सगल 3 सामन्यात पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाने सारख्याच धावा केल्याची घटना पहिल्यांदाच घटली आहे. विशेष म्हणजे या तीन सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त दोनदा विजय मिळवता आला आहे. दरम्यान, मुंबई-राजस्थान संघातील सामन्यात रॉयल्सकडून जोस बटलर आणि यशस्वी जैयस्वालने 66 धावांची शानदार भागीदारी करत संघाला आश्वासक सुरूवात करून दिली.

राजस्थानकडून मुंबई विरोधात कर्णधार संजू सॅमसनने 42 धावांची खेळी केली तर बटलरने 41 आणि शिवम दुबेने 35 धावांचे योगदान दिले. मुंबईसाठी राहुल चाहरने पुन्हा चमकदार कामगिरी बजावली. राहुलने 2 विकेट काढल्या. यानंतर क्विंटन डी कॉकच्या नाबाद 70 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 7 विकेटने राजस्थानवर मात केली.