IPL 2022, MI vs DC: ‘या’ दोन कमकुवत बाजूंमुळे दिल्ली कॅपिटल्स ‘करो या मरो’च्या फेऱ्यात अडकली, मुंबई इंडियन्स उचलू शकते संधीचा फायदा
Photo Credit - Social Media

IPL 2022, MI vs DC: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा लीग टप्पा रविवारी संपणार आहे. त्यापूर्वी शनिवारी लीग टप्प्यातील सर्वात महत्त्वाचा सामना म्हणा किंवा व्हर्च्युअल उपांत्यपूर्व फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होणार आहे. या एका सामन्याच्या निकालावर फक्त दिल्लीच नव्हे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Chalenjrs Bengalore) या दोन संघाचे प्ले ऑफचे भवितव्य अवलंबून आहे. दिल्ली जिंकली तर आरसीबी प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडेल. त्याचवेळी मुंबईचा पराभव झाल्यास RCB संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ बनेल. अशा परिस्थितीत आजचा सामना दिल्लीसाठी ‘आर या पार’चा आहे. (IPL 2022 मधील अंतिम सादरीकरणात MS Dhoni ने तरुणांवर केला कौतुकाचा वर्षाव; पाहा कोणाबद्दल काय म्हणाला)

दिल्ली कॅपिटल्सने विजयाने लीगची सुरुवात केली मात्र, मध्येच संघाची गाडी रुळावरून घसरली. त्यामुळे दिल्लीला प्ले ऑफसाठी शेवटच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तथापि दिल्ली संघाने गेल्या 4 पैकी 3 सामने जिंकून पुन्हा गती मिळवली आहे. आणि आता मुंबई इंडियन्सविरुद्ध ते आवकी विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. पण दिल्लीच्या संघाच्या मार्गात दोन मोठे अडथळे आहेत. एक म्हणजे कर्णधार ऋषभ पंतचा फॉर्म आणि दुसरा वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव. या दोन्ही गोष्टींचा फायदा रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ उचलू शकते, जे आपल्या स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असतील. अशा परिस्थितीत दिल्लीला प्ले ऑफचे तिकीट हवे असल्यास या दोन्ही कमकुवत बाजूत सुधार करण्याची गरज आहे.

दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांची खराब कामगिरी

आयपीएलच्या 15 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी चढ-उतारांनी भरला होता. खलील अहमद वगळता इतर वेगवान गोलंदाजांना फारसे प्रभाव पाडता आले खलीलने 9 सामन्यात 18.18 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षी वेगवान गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारणारा एनरिक नॉर्टजे ​​दुखापतीमुळे सलामीचा सामना खेळू शकला नाही. पण, तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने पुनरागमन केले पण, त्याची धार पूर्वीसारखी राहिली नाही. त्याने 5 सामन्यात 25.71 च्या सरासरीने फक्त 7 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुल ठाकूरने 13 सामन्यात 13 बळी घेतले आहेत पण, त्याने षटकांत 10 च्या रेटने धावा दिल्या आहेत. वेगवान गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका दिल्लीला अनेक सामन्यात सहन करावा लागला आहे.

दिल्लीची दुसरी मोठी समस्या

दिल्लीची दुसरी कमजोरी किंवा समस्या म्हणजे कर्णधार ऋषभ पंतचा फॉर्म आहे. डेविड वॉर्नर (427) नंतर पंतने या मोसमात दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक 301 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 159 आहे पण, त्याला या मोसमात आतापर्यंत एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 44 आहे. याचा फटका दिल्लीला बसला असून खालच्या फळीतील फलंदाजांवर अतिरिक्त दडपण आले आहे.