भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करणारी टीम इंडिया (India) बुधवारी, 29 जानेवारी रोजी होणाऱ्या तिसर्‍या सामन्यात न्यूझीलंडमधील (New Zealand) पहिली आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑकलंडमधील पहिले दोन टी-20 सामने जिंकून 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा विजयी रथ रोखण्यासाठी किवी संघ पूर्ण प्रयत्नात असेल. टीम इंडियाने यापूर्वी टी-20 मालिकेसाठी दोनदा न्यूझीलंडचा दौरा केला आहे. 2008-09 मध्ये महेंद्र सिंह (Mahendra Singh Dhoni) धोनीच्या नेतृत्वात मालिका 0-2 तर मागील वर्षी मालिकेत 1-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. सध्याचा भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. 2019 विश्वचषकानंतर खेळलेल्या पाच टी-20 मालिकेमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका जिंकण्याची भारतीय संघाची (Indian Team) पहिलीच वेळ असेल. (IND vs NZ 3rd T20I: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस आणणार अडथळा? हॅमिल्टनमध्ये कसे असेल हवामान, जाणून घ्या)

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा तिसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12. 20 वाजता सेडन पार्क, हॅमिल्टनमध्ये सुरू होईल. नाणेफेक सकाळी 11.50 वाजता होईल. भारतीय चाहत्यांसाठी या सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

हॅमिल्टनच्या या मैदानावर आजवर एकूण 9आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर तीन वेळा 200 किंवा अधिक धावांची नोंद झाली आहे. या मैदानावर न्यूझीलंडने सर्वाधिक धावा केल्या असून त्याही भारताविरुद्ध केल्या आहेत. 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने चार विकेट्स गमावून 212 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला 208 धावा करता आल्या.

असा आहे भारत न्यूझीलंड संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्रा सिंह चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.