KPL Fixing Scandal: बेंगळुरू पोलिस आयुक्तांचा मोठा खुलासा, हनी ट्रॅपद्वारे खेळाडू अडकले मॅच-फिक्सिंगच्या जाळ्यात
प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty Images)

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीत गुंतलेल्या बंगळुरू क्राइम ब्रँचच्या पथकाने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला (KSCA) बेंगळुरूमध्ये आयपीएलच्या शेवटच्या दोन सत्रात झालेल्या सर्व सामन्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. केपीएल (KPL) मॅच फिक्सिंग (Match Fixing) घोटाळ्याच्या नव्या घडामोडीत बंगळुरूचे (Bengaluru) पोलिस आयुक्त भास्कर राव यांनी बुधवारी मोठा खुलासा करत सांगितले की, बुकींनी हनी ट्रॅपच्या (Honey Trap) माध्यमातून खेळाडूंना ब्लॅकमेल केले होते. बेंगळुरूचे पोलिस आयुक्त राव म्हणाले की, “चौकशी सुरू असताना या टप्प्यावर मी सर्व काही उघड करू शकत नाही.  पण, मी पुष्टी करू शकतो की केपीएलच्या काही खेळाडूंना दुबई आणि मॉरिशससारख्या ठिकाणी नेण्यात आले होते. त्यांना महागड्या भेटवस्तू दिल्या. आणि मग त्यांना हनी ट्रॅपद्वारे फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवले गेले.” या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन केली जात असल्याची घोषणा करताना बेंगळुरू पोलिस आयुक्तांनी हा खुलासा केला. (Karnataka Premier League Match Fixing Case: आंतरराष्ट्रीय बुकी सय्यामला अटक)

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये म्हणत्याप्रमाणेसध्या अटकेत असलेल्या 7 खेळाडूंना अशा प्रकारेच फिक्सिंगसाठी राजी करण्यात आले होते. "चौकशीवेळी या खेळाडूंनी ही माहिती दिली आहे", असे राव यांनी सांगितले. राव यांनी पुढे सांगितले, “हनीट्रॅप आणि ब्लॅकमेल करण्यात आलेल्या केपीएलच्या काही खेळाडूंनी सट्टेबाजांच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला." सध्याच्या चौकशीसंदर्भात पोलिस आता बीसीसीआयशी संपर्क साधतील. सध्या पोलिसांनी केपीएलच्या 7 संघ मालकांसह काही खेळाडूंना चौकशीसाठी नोटीस बजावली आली आहे.

यापूर्वी पोलिसांनी केपीएलमधील बेल्लारी संघाचा कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांना अटक केली होती. दोन्ही खेळाडूंवर हुबली आणि बेल्लारी यांच्यातील केपीएलच्या अंतिम मॅचदरम्यान दोन्ही क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. गौतमने यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. अबरार रणजी खेळाडू आहे.