IPL One Season Wonder: एकेकाळी आयपीएल संघासाठी हुकमी एक्का असलेल्या ‘या’ 5 नायकांचा आज पडलाय विसर, जाणून घ्या
आयपीएल (Photo Credit: Twitter/IPL)

Forgotten players of IPL: भारतात इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सुरुवातीपासून अनेक खेळाडूंचे आयुष्य बदलले आहे. घरगुती स्तरावरील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसह खेळताना आपले कौशल्य दाखवण्याची संधी त्यांना मिळाली आहे. इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आजवर अनेक खेळाडू खेळले आहेत. यापैकी काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवलं मात्र असे काही खेळाडू देखील आहेत ज्यांना आयपीएलच्या (IPL) एका हंगामात चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले. मात्र त्यानंतर अपेक्षेनुसार त्यांना ठसा उमटवता आला नाही परिणामी ते अचानक गायब झाले आणि आज स्थिती अशी आहे की एकेकाळी संघासाठी विजयी खेळी करणाऱ्या या खेळाडूंचा चाहत्यांना आज विसर पडला आहे. या लेखात आपण अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (IPL 2021: या टी-20 सुपरस्टारने अवघ्या 37 चेंडूत आयपीएलमध्ये ठोकले शतक, पहा सर्वात वेगवान शतक करणारे 3 भारतीय फलंदाज)

1. स्वप्नील अस्नोडकर

स्वप्निलने आयपीएलच्या पहिल्याच मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शानदार खेळ केला. आयपीएल पदार्पणाच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात त्याने 34 चेंडूत 60 धावांची खेळी केली. शिवाय, संपूर्ण हंगामात त्याने 8 सामन्यातून 311 धावा कुटल्या. त्यानंतर त्याला 2011 हंगामासाठी देखील रॉयल्सने संघात कायम ठेवले मात्र, त्यानंतर त्याला खराब फॉर्ममुळे वगळण्यात आले. इतकंच नाही तर भारताच्या 2007-08 हंगामात देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली मात्र त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. स्वप्नील अखेर गोवा संघाकडून 2018 मध्ये अखेर मैदानावर झळकला.

2. मनप्रीत गोनी

पंजाबच्या या उंच गोलंदाजाने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल पदार्पणात शानदार गोलंदाजी केली होती. आपल्या पहिल्या हंगामात 17 विकेट्स घेत त्याने बॅटने देखील काही चांगले डाव खेळले होते. यांनतर त्याची भारतीय संघात देखील निवड झाली मात्र, तो अपयशी ठरला. यानंतर त्याचे करिअर खाली घसरत गेले. 2013 आयपीएलमध्ये त्याला पंजाब फ्रँचायझीने खरेदी केले पण मैदानात तो ठसा उमटवू शकला नाही.

3. डग बोलिंजर

ऑस्ट्रेलियन डावखुरा वेगवान गोलंदाज डग बोलिंजरने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या 2010 आणि 2012 आयपीएल विजेतेपदाच्या हंगामात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. आयपीएल कारकीर्दीत त्याने 27 सामन्यात 18.72 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गोलंदाजीत चांगला रेकॉर्ड विक्रम असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

4. पॉल वल्थाती

2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबकडून सामन्यात विजयाचे शतक ठोकणारा वल्थाती चर्चेत राहिला. 2012 पर्यंत तो पंजाब संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू होता. आयपीएलच्या एका सामन्यात 4 विकेट आणि अर्धशतक ठोकणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी तो एक होता. तथापि, 2012 हंगामानंतर पंजाब किंवा इतर कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही.

5. मनविंदर बिस्ला

कोलकाता नाईट रायडर्सला 2012 आयपीएल विजेतेपद जिंकून देण्यात बिस्लाने मोलाची भूमिका बजावली होती. चेन्नई संघाविरुद्ध झालेल्या त्या आयपीएल फायनलमध्ये बिस्लाने 48 चेंडूत 49 धावांची खेळी करत सीएसकेच्या विजेतेपदाच्या हॅटट्रिकचे स्वप्न भंग केले. मात्र, 2014 मध्ये कोलकाताने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. 2015 मध्ये त्याला आरसीबीने खरेदी केले पण तो दोन सामनेच खेळू शकला. यानंतर त्याला कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी करण्यात रस दाखवला नाही.