IPL 2022:  मुंबई इंडियन्सच्या सलग 5व्या पराभवानंतर कर्णधार Rohit Sharma आणि इतर खेळाडूंना लाखांचा दंड, जाणून घ्या कारण
मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2022: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या आयपीएल (IPL) 15 व्या हंगामातील अडचणीत कमी होत नाही आहे. पुण्यात पंजाब किंग्ज  (Punjab Kings) विरुद्धच्या बुधवारी आयपीएल 2022 मध्ये मुंबईचा सलग पाचवा पराभव झाल्यानंतर, त्यांना स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांच्या XI च्या उर्वरित सदस्यांना 6 लाख किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई संघाचा स्लो ओव्हर रेट या दंडाचे कारण आहे. दुसऱ्यांदा मुंबईने वेळेपेक्षा अधिक वेळात 20 षटके पूर्ण केली आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईसमोर 199 धावांचे लक्ष्य होते, पण रोहितच्या संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 186 धावाच करता आल्या आणि सामना 12 धावांनी गमवावा लागला. मुंबईने शेवटच्या पाच विकेट 34 धावांत गमावल्या. (Mumbai Indians IPL 2022: मुंबईच्या पलटनने सलग पाचवा सामना गमावला; 8 वर्षांपूर्वी झाली होती अशीच बिकट स्थिती, वाचा काय घडले होते तेव्हा)

“मुंबई इंडियन्सला त्यांच्या TATA इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधील पंजाब किंग्ज विरुद्ध एमसीए स्टेडियम, पुणे येथे 13 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे,” आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे. “आयपीएलच्या आचारसंहिता अंतर्गत या हंगामातील संघाचा हा दुसरा गुन्हा होता, जो किमान ओव्हर रेटच्या गुन्ह्याशी संबंधित होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 24 लाख रुपये आणि प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित सदस्यांना 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के, यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे,” त्यांने पुढे म्हटले.

दरम्यान, IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ सलग पाच सामने हरला आहे. या मोसमात आतापर्यंत रोहितच्या संघाने विजयाची चव चाखलेली नाही. यापूर्वी 2014 मध्ये माजी चॅम्पियन संघाची अशीच स्थिती झाली होती. मुंबईला पहिल्या सामन्यात दिल्ली, दुसऱ्या सामन्यात राजस्थान, नंतर कोलकाता, बेंगलोर आणि आता पंजाबकडून पराभवाचा सामना करावा लागकला आहे. मुंबई हा एकमेव संघ आहे ज्याने या हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे गोलंदाजांची खराब कामगिरी आणि कर्णधार रोहितचा खराब फॉर्म आहे.