Mumbai Indians IPL 2022: मुंबईच्या पलटनने सलग पाचवा सामना गमावला; 8 वर्षांपूर्वी झाली होती अशीच बिकट स्थिती, वाचा काय घडले होते तेव्हा
मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्स (Photo Credit: PTI)

Mumbai Indians IPL 2022: आयपीएलच्या (IPL) 23 व्या सामन्यात पंजाब किंग्जने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 12 धावांनी पराभवाची चव चाखवली. या मोसमात मुंबई इंडियन्सचा हा सलग पाचवा पराभव आहे. सलामीवीर शिखर धवन (70) आणि कर्णधार मयंक अग्रवाल (52) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 बाद 198 धावांची मजल मारली, तर मुंबईला बरेच प्रयत्न करूनही नऊ गडी गमावून 186 धावांपर्यंत मजल मारता आली. यासह पंजाबने पाच सामन्यांत तिसरा विजय नोंदवला आणि आयपीएल पॉईंट टेबलमध्ये (IPL Points Table) तिसरे स्थान पटकावले. नेहमीप्रमाणेच यंदाच्या हंगामात देखील रोहितच्या आर्मीची सुरूवात निराशाजनक झाली, पण तब्ब्ल आठ वर्षांनंतर मुंबईच्या ‘पलटन’ने सलग पाच सामने  गमावल्याची ही पहिलीच वेळ आहे. (IPL 2022, MI vs PBKS: मुंबईच्या पराभवाचे ‘पंचक’, ब्रेविस-सूर्यकुमारच्या झुंजार खेळी व्यर्थ; पंजाबचा 12 धावांनी विजय)

पंजाब किंग्स विरुद्धचा हा सामना मुंबई संघासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण पात्रता फेरीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संघाला आज विजय मिळवणे गरजेचे होते. मात्र आयपीएलमधील सर्वात बलाढ्य संघ असूनही यंदा मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईच्या पराभवाची मालिका सुरु झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे, पण लक्षात घ्यायचे की मुंबई व्यतिरिक्त कोणत्याही संघाने हंगामातील पहिले चार किंवा पाच सामने इतक्या वेळा गमावले नाहीत. यापूर्वी 2008 म्हणजेच आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात देखील मुंबई संघाने सलग चार सामने गमावले होते, परंतु हंगामाच्या शेवटी संघाने पाचव्या क्रमांकावर मजल मारली होती.

त्यांनतर रोहित शर्माने संघाची कमान हाती घेतल्यावर 2014 आणि 2015 मध्ये देखील अशीच बिकट स्थिती बनली होती. पहिले सामने गमावून देखील मुंबईच्या संघाने जोरदार कमबॅक केला आणि 2014 मध्ये प्लेऑफ तर 2015 मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले होते. पण असे असले तरी मुंबईचा संघ हा पलटवार करण्यासाठी प्रामुख्याने ओळखला जातो हे विरोधी संघाने लक्षात ठेवले पहिले. आता पुन्हा एकदा मुंबईने पराभवाचे ‘पंचक’ केले असून गेल्या तीनही हंगामाप्रमाणे जोरदार पुनरागमन करून संघाने प्लेऑफ फेरी गाठावी अशी अपेक्षा मुंबईच्या लाखो चाहत्यांना असेल. मुंबईचा पुढील सामना आता 16 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सशी होईल.