IPL 2022, MI vs PBKS: मुंबईच्या पराभवाचे ‘पंचक’, ब्रेविस-सूर्यकुमारच्या झुंजार खेळी व्यर्थ; पंजाबचा 12 धावांनी विजय
पंजाब किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs PBKS Match 23: आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात मिळालेल्या 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकांत 9 बाद 186 धावाच करू शकला आणि त्यांना 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईकडून डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी झुंजार खेळी केली, पण नियमित अंतराने विकेट पडत असल्यामुळे संघ आपल्या विजयाचे खाते उघडण्यात अपयशी ठरला. ब्रेविसने सर्वाधिक 49 तर सूर्यकुमार यादव 43 धावा केल्या. दुसरीकडे, दमदार फलंदाजीनंतर पंजाबने जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर आपल्या तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पंजाबकडून ओडियन स्मिथने (Odean Smith) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर कगिसो रबाडाने दोन आणि वैभव अरोराने एक विकेट घेतली. (IPL 2022: हमसे पंगा पडेगा महंगा! Dewald Brevis याचा धूम-धडाका, राहुल चाहर याच्या पहिल्याच षटकांत ‘Baby AB’ कडून चौकार-षटकारांची आतषबाजी Watch Video)

पंजाबकडून मिळालेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. पण कर्णधार रोहित शर्मा 28 आणि ईशान किशन तीन धावा करून एकापाठोपाठ पॅव्हिलियनमध्ये परतले. मात्र त्यानंतर ब्रेविस आणि वर्मा यांनी डाव सांभाळला. दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि 84 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया भक्कम केला. यादरम्यान आक्रमक फलंदाजी करणारा ब्रेविसचे पहिले आयपीएल अर्धशतक हुकले आणि स्मिथने त्याला 49 धावांवर माघारी धाडलं. ब्रेविस पाठोपाठ तिलक वर्मा 36 धावा करून धावबाद झाला. मुंबईला 24 चेंडूत विजयासाठी 49 धावांची गरज होती आणि मैदानात सूर्यकुमार व किरॉन पोलार्ड खेळत होते. पण चोरटी धाव घेण्याच्या नादात पोलार्डला स्मिथने रनआऊट करून स्वस्तात परत पाठवले. अखेरीस मुंबईला गेल्या सामन्यांमध्ये दोनदा अर्धशतकी पल्ला गाठलेल्या सूर्यकुमारयाकडून विजयची आस होती, पण रबाडाच्या बॉलवर मोठा फटका खेळताना तो माघारी परतला. स्मिथच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर उनाडकटने षटकार ठोकला. त्याने पुन्हा दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर उनाडकट सात चेंडूंत 12 धावा करून झेलबाद झाला. जसप्रीत बुमराह देखील झेलबाद झाला. त्याच षटकात टायटल मिल्सही बाद झाला आणि पंजाबने सामना जिंकला.

तत्पूर्वी पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक 70 धावा केल्या. पंजाबचे सलामीवीर शिखर धवन आणि मयंक अग्रवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून देत पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. धवनने 50 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 70 आणि मयंकने 32 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 52 धावा केल्या. तसेच जितेश शर्माने 15 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 30 धावा केल्या. सहा चेंडूंत 15 धावांची तुफानी खेळी खेळली.