File Image | आयपीएल लिलाव (Photo Credits: Twitter @IPL)

IPL 2022 Retention: आयपीएलचे 8 फ्रँचायझी मंगळवार (30 नोव्हेंबर) पर्यंत ते किती खेळाडू राखून ठेवत आहेत आणि कोणाकोणाला रिलीज करत आहेत याविषयी अंतिम निर्णय घेतील. अंतिम यादी संघांनी कदाचित तयार केली असेल, तरीही अद्याप कोणत्याही संघाने अधिकृत घोषणा केलेली नाही आणि चाहते रिटेन केलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा हंगाम पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. यादरम्यान दोन नवीन संघ सामील होत असून मेगा लिलाव देखील होणार आहे. सर्व 10 संघ पूर्णपणे नवीन असतील. तसेच जुन्या 8 संघांना जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर नवीन संघ तीन खेळाडूंपर्यंत लिलावात उतरलेल्या खेळाडूंची निवड करू शकतात. सर्व फ्रँचायझींना संघ तयार करण्यासाठी त्यांच्या पर्समधून केवळ 90 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशास्थितीत रिटेनशनचे नियम (Retention Rules) आणि त्यानुसार खेळाडूंना किती पैसे दिले जातील याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (IPL 2022: ‘ही’ आयपीएल फ्रँचायझी एकही खेळाडू रिटेन करणार नाही, लिलावात पुन्हा नव्याने करणार संघ बांधणी; कॅप्टनने ही केला रामराम)

रिटेंशन नियम

एक संघ चार पेक्षा जास्त खेळाडू ठेवू शकत नाही. त्यांना 3 पेक्षा जास्त भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी नाही. तसेच, एक संघ जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडू रिटेन करू शकतो.

रिटेन खेळाडूंना किती रक्कम मिळणार?

फ्रँचायझीने 4 खेळाडूंना कायम ठेवल्यास ते सर्व खेळाडूंवर एकूण 42 कोटी रुपये खर्च करू शकतील. उर्वरित रकमेतून त्यांना लिलावात खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत. खालीलप्रमाणे रक्कम चार राखून ठेवलेल्या खेळाडूंमध्ये विभागली जाईल...

1. एका संघाने 4 खेळाडूंना कायम ठेवल्यास 42 कोटी रुपये कापले जातील. पहिल्या पसंतीच्या खेळाडूला 16 कोटी रुपये दिले जातील तर दुसऱ्या खेळाडूला 12 कोटी रुपये दिले जातील. तिसऱ्या आणि चौथ्या पसंतीच्या खेळाडूंना अनुक्रमे 8 आणि 6 कोटी रुपये दिले जातील.

2. एखाद्या संघाने 3 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यास, पहिल्या पसंतीच्या खेळाडूला 15 कोटी रुपयांचा धनादेश मिळेल. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या रिटेन्शनला अनुक्रमे 11 व 7 कोटी रुपये दिले जातील.

3. फ्रँचायझीने 2 खेळाडूंना कायम ठेवल्यास, टॉप चॉईस खेळाडूला 14 कोटी रुपये मिळतील. दुसऱ्या निवडीला 10 कोटी रुपये दिले जातील. आणि फ्रँचायझीने फक्त एक खेळाडू कायम ठेवला तर त्याच्यासाठी 14 कोटी रुपये मोजावे लागतील. याशिवाय अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवता येईल.

दरम्यान फ्रँचायझी कोणत्याही खेळाडूला रिटेन न करण्याचाही निर्णय घेऊ शकते. आयपीएल 2014 मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या संघाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक खेळाडूला रिलीज केले होते.