IPL 2022, MI vs PBKS: मुंबईकडून एक वेळी मैदान गाजवलेल्या स्टार गोलंदाजाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांना बाद करण्यासाठी आखली खास योजना
राहुल चाहर (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs PBKS: पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) त्यांच्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या मोहिमेला विजयी सुरुवात करण्यासाठी 27 मार्च रोजी पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर आज पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरेल. मुंबईने हंगामातील आतापर्यंतचे चारही खेळलेले सामने गमावले आहेत, तर आयपीएल (IPL) 2022 मध्ये पंजाब किंग्जची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. संघाने आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी दोन सामने जिंकले आहेत तर दोन पराभव पत्करले आहेत. त्याची फलंदाजी ही संघाची ताकद असून शिखर धवन, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा यांनी चांगली कामगिरी केली आहे. (IPL 2022, MI vs PBKS: पहिल्या विजयाच्या आशेत असलेल्या मुंबईच्या ‘पलटन’मध्ये होणार मोठे बदल; पाहा कोण होणार IN कोण OUT)

मात्र, गोलंदाजी विभागात संघाकडे कगिसो रबाडा सारखा गोलंदाज आहे. कागदावर संघ गोलंदाजीतही बलाढ्य दिसत आहे, पण त्यांनी सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी अजून व्हायची आहे. रबाडा किफायतशीर गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला आहे. मात्र संघाचा फिरकी गोलंदाज राहुल चाहर (Rahul Chahar) याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व केलेल्या या फिरकीपटूने पंजाबसाठी चार सामन्यांत सात विकेट्स घेतल्या आहेत आणि या कालावधीत त्याची इकॉनॉमी फक्त सहा आहे. राहुल चाहर बुधवारी त्याच्या जुन्या फ्रँचायझीविरुद्ध खेळणार आहे. त्याने मुंबई कॅम्पमधून दोन फलंदाज निवडले जे त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी त्याने एक योजना देखील तयार केली आहे. पंजाब किंग्जला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, “मी नेहमीप्रमाणे माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन. प्रामुख्याने दोन किंवा तीन फलंदाज आहेत जे बॉलिंग करण्यास आव्हान देतात, ज्याकडे मी लक्ष देत आहे. उदाहरणार्थ सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. रोहितही अव्वल फलंदाज आहे.”

चाहर पुढे म्हणाला, “मी त्यांच्यासाठी चांगली तयारी करत आहे आणि त्यांना गोलंदाजी करण्यास उत्सुक आहे. या सर्व खेळाडूंसाठी मी एक खास योजनाही बनवत आहे. बघूया काय होते ते.” 22 वर्षीय चाहर 2018 ते 2021 या चार हंगामांय मुंबई इंडियन्सचा अविभाज्य सदस्य होता. चाहरसह पंजाब पहिल्या विजयाची आस असलेल्या मुंबईवर मात करण्यासाठी उत्सुक असेल.