IPL 2022 Points Table: मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफच्या वाटा बंद?, चेन्नई सुपर किंग्जला विजयाचा किती फायदा झाला? पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती
रवींद्र जडेजा, रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022 Latest Points Table: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला आणि एमएस धोनीने (MS Dhoni) आपला जुना फिनिशर फॉर्म दाखवून CSK ला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. या मोसमात मुंबईचा हा सलग सातवा पराभव होता. यानंतर आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात असेल आणि या विजयाचा CSK ला किती फायदा झाला, ते पॉइंट टेबल बघून समजून घेऊया. आयपीएल 2022 मध्ये सर्व संघांना एकूण 14-14 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे जर तुम्ही गणित पहिले तर मुंबई इंडियन्सचे आता सात सामने शिल्लक आहेत आणि ते सर्व जिंकले तर त्यांचे गुण 14 होतील. अशा परिस्थितीत त्यांचे प्लेऑफ गाठणे अशक्य दिसत आहे. दोन संघांच्या खात्यात 10 गुण आहेत, तर तीन संघांनी आठ गुण मिळवले आहेत. (IPL 2022: ‘फिनिशर’ MS Dhoni च्या वादळापुढे मुंबई भुईसपाट, IPL मध्ये सर्वात खराब सुरुवात करणारा मुंबई इंडियन आठवा संघ; पाहा अन्य ते कोण आहेत)

अशा स्थितीत पाचवेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ सलग दुसऱ्या वर्षी प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडू शकतो. दुसरीकडे, CSK संघाने दुसरा सामना खिशात घातला, परंतु उर्वरित सात सामने त्यांच्यासाठीही ‘करा किंवा मरो’चे असतील. सात सामन्यांतून दोन विजयांसह सीएसकेच्या खात्यात चार गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट देखील नकारात्मक आहे. अशा स्थितीत संघाला उर्वरित सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे. पॉइंट टेबलवर नजर टाकल्यास या सामन्यानंतर फारसा बदल झालेला नाही. मुंबई इंडियन्स सर्व सामने गमावल्यानंतर दहाव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, चेन्नई 7 सामन्यात 2 जिंकून 4 गुणांसह 9व्या क्रमांकावर विराजमान आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी येथून जवळपास सर्व सामने जिंकावे लागतील.

याशिवाय गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रत्येकी 10 गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील. या सामन्यातील विजय राजस्थानला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून देण्यात फायदेशीर ठरेल तर दिल्लीचा विजय त्यांना गुणतालिकेत पहिल्या चार मध्ये स्थान मिळवून देईल.