मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 च्या सीजनसाठी खेळाडूंच्या लिलावाला  (Players Auction) आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र त्यापूर्वी 10 संघांनी 33 खेळाडूंना कायम ठेवले आहे. 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) देखील 4 खेळाडूंना त्यांच्यासोबत कायम ठेवले आहे. कर्णधार रोहित शर्मा सोबत वेस्ट इंडिजचा (West Indies) अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्डचाही (Kieron Pollard) समावेश आहे. मेगा लिलावापूर्वी त्याला मुंबई इंडियन्सने 6 कोटी रुपयांमध्ये पोलार्डला कायम ठेवले होते. पण पोलार्डच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अष्टपैलू खेळाडूला त्रास होत असल्यामुळे दुसऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यासाठी पोलार्डच्या जागी निकोलस पूरन कर्णधार म्हणून समोर आला. (IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावात ‘या’ सलामीवीरांवर असणार मुंबई इंडियन्सची नजर, बनू शकतात रोहित शर्माचे ओपनिंग पार्टनर)

वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूच्या अलीकडील दुखापतीमुळे आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) अडचणीत येऊ शकते कारण दुखापतीचा त्रास कायम राहिल्यास त्यांना पोलार्डची योग्य बदली शोधण्याची गरज भासू शकते. मुंबई इंडियन्सने किरोन पोलार्डवर आणखी एका आयपीएल हंगामासाठी भरपूर पैसे उधळले आहेत. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सने पोलार्डला कायम ठेवून मोठी चूक केली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून पोलार्डला सतत दुखापत होत असून मुंबई इंडियन्ससाठी ही डोकेदुखी वाढवणारी बाब आहे. भारतात येण्यापूर्वी पोलार्डने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते. पण, त्यापूर्वीच त्याने दुखापतीतून सावरण्यासाठी त्रिनिदादमध्ये पुनर्वसन केले होते.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू फ्रँचायझीचा अविभाज्य भाग आहे आणि त्याने 2010 पासून प्रत्येक हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. 34 वर्षीय पोलार्डने सर्वाधिक 578 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 11 हजारांहून अधिक धावा आणि 304 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच तो या फॉरमॅटचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. अलीकडच्या काळात मुंबईच्या यशात पोलार्डची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दरम्यान, दुखापतीमुळे पोलार्डने महत्त्वाचा सामना न खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो विंडीज संघाच्या पाकिस्तान दौऱ्यावरही गेला नव्हता. आणि त्यापूर्वी टी-20 विश्वचषकातही दुखापतीमुळे तो त्रस्त झाला होता आणि बांगलादेशविरुद्ध सामन्यातून त्याने माघार घेतली होती.