IPL 2022: गुजरात टायटन्सला मोठा झटका, इंग्लंडचा स्टायलिश फलंदाज जेसन रॉयने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय; जाणून घ्या कारण
जेसन रॉय (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामातून टी-20 लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या फ्रँचायझी पैकी गुजरात टाइटन्स (Gujarat Titans) संघाला स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा स्टायलिश सलामीवीर जेसन रॉय (Jason Roya) याने बायो-बबल थकव्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली. गेल्या महिन्यात आयपीएल 2022 मेगा लिलावात (IPL Mega Auction) 2 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या रॉयने गेल्या आठवड्यात फ्रँचायझीला त्याचा निर्णय कळवळा होता. गेल्या वर्षी डेविड वॉर्नरच्या हकालपट्टीनंतर फ्रँचायझीने सलामीचे स्थान दिल्यानंतर रॉयसाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघासाठी आयपीएल 2021 चांगला हंगाम ठरला होता. त्यानंतर गुजरातने लिलावात त्याला त्याच्या मूळ किंमतीला विकत घेतले. पण, रॉयच्या बाहेर पडण्याचा अर्थ असा आहे की संघाला आता बदली खेळाडूचा संघात समावेश करावा लागणार आहे. (IPL 2022: गुजरात टायटन्स संघाच्या लोगोचे अनावरण, धाकड अष्टपैलू हार्दिक पांड्या याच्या हाती आहे संघाची कमान)

दरम्यान रॉयने अलीकडेच पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेत देखील शानदार खेळी केली आणि फक्त 6 सामन्यांमध्ये 303 धावा केल्या. क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून उदयास आला आणि मर्यादित सामने खेळूनही तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. 50.50 च्या सरासरीने आणि 170.22 च्या स्ट्राइक-रेटसह, रॉय माघार घेण्यापूर्वी आयपीएलच्या 15 व्या आवृत्तीसाठी सर्वात परिपूर्ण रीतीने तयारीत दिसत होता. याशिवाय रॉयला नुकतंच दुसरे मुलं झाले आहे आणि त्याने आयपीएल 2022 मध्ये भाग घेतला असल्यास त्याला कदाचित दोन महिन्यांहून अधिक काळ आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागले असते. लीगची 15 वी आवृत्ती 26 मार्च रोजी सुरू होणार आहे आणि त्याची सांगता 29 मे रोजी होणार आहे.

कोविड 19 चा उद्रेक झाल्यापासून बर्‍याच खेळाडूंनी आयपीएलमधून उशीरा माघार घेतली आहे आणि बायो-बबल थकवामुळे टूर्नामेंट मध्येच सोडली आहे. गुजरात टायटन्सकडे आता नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी रॉयची जागा घनु शकणाऱ्या खेळाडूची निवड करण्याचे कठीण काम आहे. लक्षात घ्यायचे की रॉयने आयपीएल लिलावात खरेदी केल्यावर स्पर्धेतून माघार घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी IPL 2020 लिलावात त्याला दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या 1.5 कोटीच्या मूळ किमतीत विकत घेतले होते परंतु त्याने स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला.