IPL 2021: यंदाच्या हंगामात ‘या’ विदेशी फलंदाजाने ठोकले वेगवान अर्धशतक; पहा टॉप-5 मध्ये तीन भारतीयांचा समावेश
किरोन पोलार्ड आणि कृणाल पांड्या (Photo Credit: PTI)

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) शनिवारी यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले आणि दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला ओव्हरटेक केलं. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात सुरु असलेल्या आयपीएलच्या 25 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीर शॉने 18 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. पण शॉने काही दिवसांपूर्वी केलेला रेकॉर्ड पोलार्डने मोडून काढला. त्याने आयपीएल (IPL) 2021 मध्ये अवघ्या 17 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. अर्धशतक ठोकणे हे बर्‍याचदा चांगल्या आणि दर्जेदार फलंदाजाचे मापदंड होते आणि आयपीएलमध्ये आतापर्यंत काही फटके आणि वेगवान अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. आपण अशाच टॉप-5 वेगवान अर्धशतकांबाबत आज चर्चा करणार आहोत. (MI vs CSK IPL 2021 Match 27: किरोन पोलार्डचे वेगवान अर्धशतक, चेन्नईच्या विजयी ‘एक्सप्रेस’वर लागला ब्रेक; मुंबई इंडियन्सने मिळवला दिमाखदार विजय)

1. किरोन पोलार्ड

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू किरोन पोलार्डने आयपीएल 2021 मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीत त्याने अवघ्या 17 चेंडूत 5 चौकार व 6 षटकारांसह अर्धशतकी धावसंख्या पार केली. पोलार्डने 34 चेंडूंत नाबाद 87 धावा फटकावल्या आणि मुंबईला शेवटच्या चेंडूवर 4 गडी राखून विजय मिळवून दिला आणि आयपीएलमधील दुसऱ्या सर्वाधिक धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला.

2. पृथ्वी शॉ

दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल 2021 मध्ये वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज आहे. पृथ्वीने कोलकाताविरुद्ध 18 चेंडूत पूर्ण केले. पोलार्डपूर्वी यंदा आयपीएलच्या वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड शॉच्या नावर होता. केकेआर विरोधात त्या सामन्यात पृथ्वीने 82 धावा ठोकल्या होत्या.

3. अंबाती रायुडू

मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सना पत्करावा लागला असला तरी अंबाती रायुडूने मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे. या सामन्यात त्याने ताबडतोड फलंदाजी केली आणि अवघ्या 20 चेंडूत अर्धशतकी धावसंख्या गाठली. रायुडूने मुंबईविरुद्ध नाबाद 72 धावांची तुफान खेळी केली.

4. दीपक हुड्डा

आयपीएल 14 मध्ये पंजाब किंग्सच्या दीपक हुड्डाने सर्वात पहिले आणि वेगवान अर्धशतक ठोकले होते. त्याने राजस्थान रॉयल्स विरोधात वानखेडे स्टेडियमवर 12 व्या सामन्यात 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते आणि सामन्यात 64 धावांची खेळी केली होती.

5. आंद्रे रसेल

वेस्ट इंडिजचा आणखी एक तडाखेबाज अष्टपैलू आंद्रे रसेलचा देखील आयपीएलच्या वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये समावेश आहे. रसेलने सीएसके विरुद्ध वानखेडेवर 21 चेंडूत हा कारनामा केला आणि सामन्यात 54 धावांची स्फोटक खेळी केली.

दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात वेगवान अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 2018 मध्ये 14 चेंडूत विक्रमी अर्धशतक ठोकले होते. विशेष म्हणजे राहुलचा हा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ अद्याप कोणीही पोहचू शकलेला नाही आहे.