
IPL 2021 in UAE: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यूएईमध्ये पोहोचल्यानंतर अनेक संघांनी त्यांचे प्रशिक्षण सुरु केले आहे. दरम्यान, लीगचा पहिला विजेता राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) दुसरा टप्पा होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. संघाचे दोन तडाखेबाज फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) लीगच्या 14 व्या हंगामातून बाहेर पडले आहेत. हे दोन्ही खेळाडू यापुढे दुसऱ्या हाफमध्ये खेळणार नाहीत. राजस्थान रॉयल्सनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फ्रँचायझीने इंग्लंडच्या या दोन स्टार खेळाडूंच्या जागी वेस्ट इंडीजचे एविन लुईस (Evin Lewis) आणि ओशेन थाॅमस (Oshane Thomas) यांना संघात सामील केले आहे. लुईसने 2018 आणि 2019 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये दोन हंगाम खेळले आणि 16 गेममध्ये 26.87 च्या सरासरीने 430 धावा केल्या. 29 वर्षीय खेळाडूने 2016 मध्ये भारतात आयोजित वर्ल्ड टी-20 मोहिमेदरम्यान वेस्ट इंडीजसाठी पदार्पण केले आणि 158 च्या स्ट्राइक रेटने 45 टी-20 मध्ये 1318 धावा केल्या आहेत. (IPL 2021 Replacement Players: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी ‘या’ 4 संघांनी बदली म्हणून 9 खेळाडूंचा केला समावेश, पहा कोण IN आणि कोण OUT)
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सध्या बार्बाडोस रॉयल्सकडून खेळत असलेला वेगवान गोलंदाज थॉमसने 2019 मध्ये रॉयल्ससाठी आयपीएल पदार्पण केले आणि 4 सामने खेळले पण गेल्या हंगामात बेंचवर बसावे लागले. थॉमसने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, त्याने 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27 आणि 17 टी 20 मध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. “आयपीएल (IPL) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने आज त्यांच्या बदली खेळाडूंच्या अंतिम संचाची घोषणा केली. एविन लुईस आणि ओशेन थॉमस ही वेस्ट इंडीज जोडी आयपीएलच्या उर्वरित भागांसाठी बदली खेळाडू म्हणून रॉयल्स संघात सामील होणार आहे,” फ्रँचायझीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. बटलर आणि पत्नीचे दुसरे मुल यंदा या महिन्यात जन्माला येणार असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. तसेच बटलरने यापूर्वी याच कारणामुळे भारताविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता.
OT in the chat. 😉
Welcome back to the #RoyalsFamily, Oshane 🔥 pic.twitter.com/V9nQqRfJxf
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 31, 2021
दरम्यान, अष्टपैलू स्टोक्सने त्याच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. स्टोक्सने भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी स्वतःला अनुपलब्ध केले होते आणि त्याच्या जागी क्रेग ओव्हरटनला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले होते. बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर पडण्यापूर्वी स्टोक्सने आयपीएल 2021 मध्ये राजस्थानसाठी एकमेव सामना खेळला होता. तर बटलरने 7 सामने खेळले आणि 36.28 च्या सरासरीने 254 धावा केल्या.