IPL 2020 Update: क्रिस गेल आयपीएलच्या सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होणार सामील? पाहा कसे
किंग्ज इलेव्हन पंजाबचा क्रिस गेल (Photo Credits: IANS)

संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे यंदा इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 चे 19 सप्टेंबरपासून आयोजन होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप वेळापत्रक जाहीर केले नाही, पण आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी यापूर्वी तारखा जाहीर केल्या आहेत. यानंतर आयपीएल (IPL) फ्रँचायझींनी देखील आगामी हंगामासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. फ्रँचायझी आणि खेळाडू ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत युएई येथे दाखल होतील आणि खेळाडू लवकरच सरावाला सुरुवात करतील. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशातील काही खेळाडूंना लीगच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागेल. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया टीम इंग्लंड दौऱ्यावर असून याच महिन्यात कॅरिबियन प्रीमियर लीगचे (Caribbean Premier League) आयोजन होणार असल्याने वेस्ट इंडिजचे काही खेळाडू देखील पहिल्या सामन्यात सहभाग घेऊ शकणार नाही, पण विंडीजचा धडाकेबाज क्रिस गेल (Chris Gayle) आयपीएल फ्रँचायझी किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये सुरुवातीपासून सामील होईल. (IPL 2020 Update: दक्षिण आफ्रिका क्रिकेटपटूंचं आयपीएलमध्ये खेळल्यावर संशय; CSK, RCB समोर मोठं टेंशन)

सीपीएलचे (CPL) आयोजन ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान होणार असून गेलने यापूर्वीच घरच्या लीगमधून माघार घेतली आहे, त्यामुळे तो पंजाबच्या सह खेळाडूंसोबत सुरुवातीपासून सामील होईल आणि सामन्यासाठी तयारी करेल. गेलला आपल्या कुटुंबासह आणि मुलांसमवेत थोडा वेळ घालवायचा होता आणि त्यामुळे त्याने सीपीएलच्या आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे युनिव्हर्स बॉस आपल्या कुटुंबापासून दूर असल्याचे वृत्त समोर आले आहे.

दरम्यान, गेल वेळेवर आयपीएलच्या फ्रँचायझीमध्ये सामील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टार्सपैकी एक असेल का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल आयपीएलमध्ये 125 सामने खेळला आहे आणि 2018 मध्ये पंजाब टीममध्ये सामील होण्यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा 4 ते 15 सप्टेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे अशा स्थतीत या टीममधील खेळाडू देखील आयपीएलमध्ये सुरुवातीपासून उपलब्ध होऊ शकणार नाही.