किंग्स इलेव्हन पंजाबकडून (Kings XI Pujab) फिरकीपटू कृष्णप्पा गौतमने (Krishnappa Gowtham) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) पहिल्या डावाची अखेरची ओव्हर टाकली आणि 25 धावा लुटवल्या. पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) या निर्णयावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkr) आश्चर्य व्यक्त केलं. सामन्याच्या अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गौतमच्या चेंडूवर मुंबईच्या कीरोन पोलार्डने (Kieron Pollard) षटकार लगावले आणि मुंबईचा स्कोर 190 पार नेला. अंतिम ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) भव्य षटकार ठोकला. फिरकी गोलंदाजाचा वापर करण्याचा राहुलचा निर्णय पांड्या आणि पोलार्डच्या जोडीसाठी वरदान सिद्ध झाला. याच ओव्हरने मुंबईला पंजाबविरुद्ध 192 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य नोंदविण्यात मदत मिळाली. पोलार्डने 20 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या तर हार्दिक पांड्याने 11 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. (MI vs KXIP, IPL 2020: पंजाबचा खेळ खल्लास! मुंबई इंडियन्सने 48 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत मिळवले अव्वल स्थान)
डावाची अंतिम ओव्हर गौतमला देण्याच्या राहुलच्या निर्णयावर मास्टर-ब्लास्टरने प्रतिक्रिया दिलीच सोबतच मुंबईचा कर्णधार रोहितच्या अर्धशतकी डावाचेही कौतुक केले. सचिन म्हणाला,"191 या मैदानावर एक स्पर्धात्मक धावसंख्या आहे. रोहित शर्माने शानदार डाव साकारला. 20व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि कीरोन पोलार्ड विरुद्ध गोलंदाजीचा ऑफ स्पिनर!" गौतमने आपल्या 4 ओव्हरमध्ये 45 धावा घेत 1 विकेट घेतली. गौतमची ओव्हर पंजाबसाठी महागडी सिद्ध झाली. दरम्यान, आजच्या सामन्यात विजयासह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अव्वल तर पंजाब सहाव्या स्थानी घसरली. पाहा सचिनची पोस्ट:
191 is a very competitive total on this ground. Brilliantly paced innings by @ImRo45. An off spinner to bowl against @hardikpandya7 and @KieronPollard55 in the 20th over! 🤦♂️#KXIPvMI #IPL2020
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 1, 2020
दरम्यान, या सामन्यात मुंबईने पंजाबचा 48 धावांनी पराभव केला. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने आयपीएल 2020 मधील आपला दुसरा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अव्वल 4 मध्ये स्थान मिळविले. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुलचा निर्णय योग्य ठरत असताना रोहित, पोलार्ड आणि हार्दिकच्या फटकेबाजीने मुंबई इंडियन्सला 191 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत पंजाबला अडचणीत टाकले. मुंबईने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात पंजाब संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 143 धावाच करू शकला आणि 48 धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.